कोरोना पसरतोय म्हणून आठवडी बाजारातील शेतकर्‍यांना उठवले

माजलगाव
  • सीओ साहेब कशाला शेतकर्‍यांचा जीव खाताय?
    संतप्त शेतकर्‍यांनी भाजीपाला दिला फेकून
  • माजलगाव नगर परीषद प्रशासनाचा सर्वत्र निषेध
    माजलगाव, दि. 20 : कोरोनाचा संसर्ग वाढतोय म्हणून आठवडी बाजार न भरू देणार्‍या नगर परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ आज शेतकर्‍यांनी सर्व भाजीपालाच रस्त्यावर फेकून दिला. या हृदयद्रावक प्रकाराचे व्हीडिओ दैनिक कार्यारंभच्या फेसबूक पेजवरून व्हायरल झाल्यानंतर माजलगाव पालिका प्रशासनाविरोधात सर्वत्र चीड व्यक्त होत आहे.

    एकीकडे राजकीय नेत्यांच्या सभा सुरु आहेत. मोठ मोठ्या महाराजांची कीर्तने सुरु आहेत. पण त्यांच्यावर कारवाई करायला घाबरणार्‍या प्रशासनाला आठवडी बाजारात भाजी-पाला विकायला आलेले शेतकरीच कसे दिसतात? बुधवारी माजलगावचा आठवडी बाजार होता. त्यामुळे शेतकर्‍यांनी स्वतःच्या शेतात लावलेला भाजीपाला विक्री करण्यास आणला होता. येथील बी अ‍ॅन्ड सी रोडवर भाजीपाला विक्री करण्यासाठी बसलेल्या शेतकर्‍यांना आज नगर पालिका प्रशासनाकडून बसण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे हा भाजीपाला कुठे विकायचा? तुम्हाला आम्ही गरीबच कसे दिसतो? असे म्हणत शेतकर्‍यांनी संतापाच्या भरात सर्व भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र भाजीपाल्याचा सडाच झालेला होता. माजलगावातील या घटनेने नगर पालिका प्रशासनाविरोधात प्रचंड चीड व्यक्त होत आहे.

पालकमंत्री, आमदारसाहेब कार्यकर्त्यांच्या
गर्दीतून शेतकरी दिसतो का?

जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके यांना शेकडो कार्यकर्त्यांच्या गर्दीतून सामान्य शेतकर्‍यांचा हा प्रश्न दिसतोय का? त्यांनी केलेल्या गर्दीत कोरोना चेंगरून मरतो आणि भाजीपाल्यावरून मात्र पसरतो असे काही आहे का? हातावर पोट असणार्‍या लोकांच्या या प्रश्नावर तुम्ही कधी बोलणार आहात की नाही? याचं उत्तर दोघांनीही द्यावं. अन्यथा नगर पालिका प्रशासनाला शेतकर्‍यांना त्रास न देण्याबाबत सक्त ताकीद देण्यात यावी अशी आपणास शेतकर्‍यांच्या वतीने विनंती आहे.

गुलाल उधळत बोंबलत फिरणार्‍यावर कारवाई करा
बीड जिल्ह्यातील नगर पंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांसोबत ज्येष्ठ नेते आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते गुलालाची उधळण करत विजयी जल्लोष करीत आहेत. तसेच विकासकामाच्या नावाखाली गर्दी जमवणार्‍या राजकीय नेते-कार्यकर्ते मंडळीवर आपत्तीव्यवस्थान कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत. माजलगाव येथील आठवडे बाजारास आलेल्या शेतकर्‍यांना मनाई करत त्यांचे आर्थिक नुकसान करत त्यांना रस्त्यावर भाजीपाला फेकुन देण्यास भाग पाडणार्‍या महाभागांवर आपत्तीव्यवस्थान कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री यांच्याकडे केली आहे. त्यांनी म्हटले आहे की बीड जिल्हा प्रशासनाकडून राजकीय नेत्यांची तळी उचलण्याचे हुजरेगिरी करण्याचे प्रदर्शन होत असून कायदा सर्वसामान्य माणसालाच लागू होतो, राजकीय नेतेमंडळी कायदा धाब्यावर बसवत असताना मात्र जिल्हाप्रशासन मूग गिळून गप्पच रहात आहे. संबधित प्रकरणात कारवाई न केल्यास बीड जिल्हा प्रशासनाविरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tagged