आमदारांच्या गाडीवरील 11 हजाराचा दंड जागेवर वसूल!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव ग्रामीण पोलीसांची कारवाई
बीड
दि.26 : पुढारी, लोकप्रतिनिधी यांच्या गाड्या शक्यतो पोलीस अडवताना दिसत नाहीत. तसेच आडवल्याच तर काय प्रकार घडतो, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पोलीसांकडूनही फक्त सर्वसामान्यांच्याच गाड्या आडवल्या जातात. पण माजलगाव ग्रामीण पोलीसांनी चक्क आमदारांची गाडी अडवली, तिच्यावर 11 हजार रुपये पेंडींग दंड असल्याचे पोलीसांनी निदर्शनास आणून दिले. यावर आमदाराची गाडी आहे, असे सांगूनही निघून गेले असते. पण पोलीसांप्रती असलेली आत्मियता दाखवत जागेवरच हा दंड भरला व पोलीसांना सहकार्य केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील परभणी फाटा येथे विशेष मोहिमेअंतर्गत मोटार वाहन कायद्यानुसार माजलगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयसिंग झोनवाल, उपनिरीक्षक सचिन दाभाडे, पोह.प्रधान चालक इचके हे कारवाई करत होते. यावेळी एक फोर्च्युनर गाडी (एमएच-44 एस-0009) तिथून जाताना आडवली. यावेळी ती फोच्यूनर केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांच्या नावावर असल्याचे समजले. व त्या गाडीवर 11 हजार रुपयांचा पेंडिंग दंड असल्याचे दिसले. यावेळी चालकाने अक्षय मुंदडा यांना संपर्क केला. यावर त्यांनी कुठलेही पुढारपण न दाखवता दंड भरा व पोलीसांना सहकार्य करा असे सांगितले. चालकाने 11 हजार रुपये दंड भरला. पोलीसांच्या कर्तव्याबद्दल दाखवलेल्या आत्मियतेबद्दल मुंदडा यांचे कौतूक होत आहे. तर पोलीसांनीही आमदारांची गाडी आडवून दंड वसूल करत कायदा सर्वांसाठी सारखा असल्याचे दाखवून दिले.

Tagged