राज्य उत्पादन झोपेत; बीडमध्ये बनावट देशीचे उत्पादन जोरात!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र


स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई तीन लाखांची बनावट दारु जप्त

केशव कदम।बीड

दि.3 ः बीडसह जिल्हाभरामध्ये अवैध दारु विक्रीचा सुळसुळाट सुरु आहे. विशेष म्हणजे मागील काही महिन्यांपासून बनावट दारुचे प्रमाण अधिकच वाढले आहे. तसेच परराज्यातील दारुही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्कचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नितीन धार्मीक यांनी मोठ्या प्रमाणात कारयावा करत याला आळा घातला होता. परंतू नियुक्तीच्या ठिकाणी कमी आणि परजिल्ह्यात अधिक काळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकामुळे दारु माफियांचे मनोबल अधिक वाढले आहे. बुधवारी (दि.2) रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या टिमने बीड तालुक्यातील शिदोड येथे बनावट देशी दारु तयार व विक्री करणार्‍यावर कारवाई केली. यावेळी पावने तीन लाखांची दारु जप्त करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक यांनी बीड जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती घेवून कारवाया करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले आहे. त्यानुसार बीड तालुक्यातील शिदोड शिवारात एका पत्र्याचे शेडमध्ये सोनाजी अशोक जाधव (वय 28 रा.गांधीनगर, बीड) हा बनावट दारु तयार करुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली. या छाप्यात बनावट दारु तयार करण्याचे साहित्य, दारु असा 2 लाख 94 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सोनाजी जाधव यावर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 341/2022 कलम 328 भादंविसह कलम महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे सुधारीत 2018 चे कलम 12, 13, 65(अ),(ब),(क), (ड), (ई), (फ), 80 व 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला. ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, पोह.मनोज वाघ, रामदास तांदळे, पोना.विकास वाघमारे, सोमनाथ गायकवाड, प्रसाद कदम, देविदास जमदाडे, नारायण कोरडे चालक अशोक कदम यांनी केली.

Tagged