वाहने चोरी करणारी टोळी एलसीबीने केली गजाआड!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड मराठवाडा


चोरीच्या दोन चारचाकीसह आठ दुचाकी जप्त
बीड
दि.11 : जिल्ह्यात वाहनचोरांचा धुमाकूळ सुरु असतानाच बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत आणि पथकाला जिल्ह्यासह परजिल्ह्यातील वाहने चोरणार्‍या टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे. चोरट्यांकडून दोन चार चाकी व आठ दुचाकी असा एकूण 13 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यात वाहनचोरीच्या घटना प्रचंड वाढल्या. हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी स्थागुशाचे निरीक्षक भारत राऊत यांना सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सर्व पथक वाहन चोरणार्या चोरट्यांच्या मागावर होते. माजलगाव ग्रामीण ठाणे हद्दीतून पाच महिण्यापुर्वी चोरी गेलेली दुचाकी विष्णु भगवान केकाण (रा.चाटगाव ता.धारुर) व त्याच्या एका साथीदाराने चोरुन नेली होती. तसेच आता विष्णु केकाण सध्या त्याचे घरी आला आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचार्यांनी चाटगाव (ता.धारुर) येथे जावून विष्णु भगवान केकाण यास शिताफिने ताब्यात घेतले. त्यास पात्रुड येथून चोरुन आणलेल्या व इतर ठिकाणी चोरलेल्या वाहनाबाबत विचारपुस केली. तेव्हा अन्य एका साथीदाराच्या मदतीने पात्रुड (ता.माजलगाव), लातुर, लोणावळा (जि.पुणे), औंढा (जि. हिंगोली) येथून दोन चाकी, चारचाकी वाहने चोरी केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी, बोलेरो पिकअप, टाटा सुमो ही वाहने जप्त केली. तसेच त्याचे इतर फरार साथीदार राजेंद्र अशोक शेळके आणि शेख कलीम हुसेन यांच्याकडून चोरीच्या अन्य पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. तीनही चोरांकडून दोन चारचाकी आणि आठ दुचाकी असा एकूण 13 लाख 40 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनाच्या संदर्भाने माजलगांव ग्रामीण ठाण्यात 2 गुन्हे, लातुर जिल्हयातील एमआयडीसी व विवेकानंद चौक ठाण्यात 3, लोणावळा ठाण्यात 1 व हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ठाण्यात 1 असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान अन्य दोन वाहनाच्या संदर्भाने दाखल गुन्ह्यासंदर्भात माहिती घेतली जात असून तीनही आरोपींना पुढील तपासासाठी माजलगाव ग्रामीण पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अशी माहिती माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि.भारत राऊत यांनी दिली.

Tagged