PANKAJA MUNDE

बाहेरच्या लोकांनी बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये – पंकजाताई मुंडे

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र राजकारण

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसमोर बोलून दाखवली उघड नाराजी

प्रतिनिधी । बीड
दि.20 : पंकजाताई मुंडे यांनी आता उघडपणे आपली नाराजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच बोलून दाखवली. त्या म्हणाल्या, आमच्या जिल्ह्यातील सुखाचा संसार आम्हाला सांभाळू द्या, बाहेरच्या लोकांनी आता बीड जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. यावेळी त्यांनी महाभारताच्या युद्धातील करण-अर्जुन यांच्या रथाचं उदाहरण दिलं. त्यामुळे पंकजा यांच्या भाषणानंतर कर्ण आणि अर्जुन कोण? याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत.

मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपने मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमात पंकजाताई मुंडे आल्या होत्या. पंकजाताई मुंडे यांच्या भाषणावेळी स्टेजवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्यातील भाजपचे आमदार आणि सगळे नेते उपस्थित होते. पंकजाताई मुंडे म्हणाल्या, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कधीच थांबला नाही पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील शिस्त आता बिघडवू द्यायची नाही. जिल्ह्याची घडी बसवण्यासाठी जिल्ह्याच्या मातीतील माणूस लागतो. बाहेरच्या लोकांनी जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये. बीड जिल्ह्याच्या मतांमुळे महाराष्ट्राच्या विकासालाा मोठा फरक पडतो, सत्तेतील मंत्र्यांनी जिल्ह्याला भरभरून द्यावं, अशी अपेक्षा आहे. आज माझ्याकडे कोणतंही पद नाही. आमचा सुखाचा संसार चालू द्या, आम्ही लोक मिळून आमचा जिल्हा चांगला सांभाळतो,’ असं वक्तव्य देखील पंकजाताईंनी केलं. मुंडे साहेबांचे नेते अटलजी आणि आडवाणी होते. आमचे नेते मोदी आणि शहा आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मला हेलिकॉप्टरमधून इथे घेऊन आले आहेत. त्यामुळे पुढे दोनचार महिने त्यांना त्रास होऊ शकतो. असे म्हणत त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर आपली मोठी नाराजी असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावताना त्या म्हणाल्या भाजपच्या कुशीत वाढलेली मी खरीखुरी कार्यकर्ता आहे. भाजप आणि मुंडे साहेब यांना कधीही वेगळं करता येणार नाही, असं म्हणत त्यांनी पक्षातच राहणार असल्याचे सुतोवाच केले आहेत.