प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; 25 एप्रिलपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे राज्य शासनाचे आदेश
प्रतिनिधी । बीड
दि.18 : राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या तसेच, नव्याने स्थापित झालेल्या आणि सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणुका न झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात अंदाजे 200 ग्रामपंचायतींसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. प्रभाग रचना कार्यक्रमावरून उर्वरित ग्रामपंचायतीच्या निवडणुका मे महिन्याच्या दुसर्या तिसर्या आठवड्यात जाहीर होऊन जुनमध्येच निवडणुकांचा बार उडणार असे दिसत आहे.
ग्रामविकास विभागाने मंगळवारी (दि.17) याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार गुगल मॅपवर एमआरएस-सीचे नकाशे सुपर इंपोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करण्यासाठी तहसीलदारांना 30 जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. तलाठी आणि ग्रामसेवकांना स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्चित करण्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील व गटविकास अधिकारी, संबंधित मंडळ अधिकार्यांचा समावेश असलेल्या समितीने प्रभाग रचनेची तपासणी करायची आहे. या समितीचे प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव 21 फेबु्रवारीपर्यंत जिल्हाधिकार्यांकडे मान्यतेसाठी सादर करायचा आहे. यानंतर जिल्हाधिकार्यांनी 3 मार्चपर्यंत प्रस्तावांची तपासणी करून दुरुस्तीसाठी मान्यता द्यायची आहे. दुरुस्त्या अंतर्भूत करून तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने 14 मार्चपर्यंत मान्यता द्यायची आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागविण्यासाठी 17 मार्च रोजी जाहीर सूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. 24 मार्चपर्यंत हरकती सादर करण्यात येणार असून, 14 एप्रिलपर्यंत उपजिल्हाधिकार्यांना त्या अभिप्रायासह जिल्हाधिकार्यांकडे सादर कराव्या लागणार आहेत. प्राप्त प्रस्ताव तपासून जिल्हाधिकार्यांनी प्रभाग रचना 17 एप्रिलपर्यंत निवडणूक आयोगास सादर करावी. या अंतिम रचनेला जिल्हाधिकारी 25 एप्रिल रोजी व्यापक प्रसिध्दी देणार आहेत. दरम्यान, आता महसूल व ग्रामविकास प्रशासन प्रभाग रचनेच्या कामाला लागणार आहे.