paithan

पैठणच्या संंतपीठाचा 40 वर्षाचा वनवास संपणार

न्यूज ऑफ द डे मराठवाडा महाराष्ट्र

पैठण : 40 वर्षापासून रेंगाळत पडलेला संतपीठ प्रश्न येत्या जानेवारी महिन्यामध्ये संत अभ्यासक्रम सुरू करून अभिवचन पूर्ण करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पैठण येथे शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

   मंत्री उदय सामंत व रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी चाळीस वर्षापासून रेंगाळत पडलेल्या पैठण येथील नाथसागर धरणाच्या पायथ्याशी संतपीठ बांधकाम झालेल्या इमारतीची पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला होता. यावेळी मराठवाडा 42 विकास कार्यक्रमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या व प्रतिक्षा संताचा अभ्यासक्रम सुरू न झालेल्या इमारतीची पाहणी करून जानेवारी महिन्यामध्ये याठिकाणी राज्य शासन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ यांच्या माध्यमातून अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांचीही उपस्थिती होती. यावेळी नाथसागर धरणाची पाहणी करण्यात आली केल्यानंतर मराठवाड्याला वरदान ठरलेल्या धरण परिसराची माहिती उदय सामंत यांना प्रभारी अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली आहे. यावेळी आमदार अंबादास दानवे, जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन नंदलाल काळे, नगरसेवक तुषार पाटील, ईश्वर दगडे, जिल्हा परिषद सदस्य साईनाथ बापू सोलाट आदी पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काय आहे संतपीठाचा ईतिहास?
तत्कालीन मुख्यमंत्री कै.बॅरिस्टर अ.र.अंतुले यांनी 23 जानेवारी 1981 संतपीठ घोषणा केली होती. या संतपीठाचे अभ्यासक्रमाचे स्वरूप तयार करण्यासाठी कै.बाळासाहेब भारदे यांची समिती गठीत करण्यात आली होती. त्यानंतर पैठण भूमिपुत्र तत्कालीन केंद्रीय मंत्री कै शंकरराव चव्हाण अनेक वेळेस राज्य शासनाकडून पाठपुरावा केला संत ज्ञानेश्वर उद्यानामधील 17 एकर जमीन परिसरात या संतपीठाचे स्थापना करण्यात आल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, कै.उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांनी निधी उपलब्ध करून देऊन भव्य स्वरूपाची इमारत उभारणी झाली. या संतपीठामध्ये अभ्यासक्रमचे कामकाज शिक्षण विभागामार्फत चालविण्याचा ठराव 2005 यावर्षी सांस्कृतिक मंत्री यांनी घेतला होता. संतपीठाचे पीठाचार्य म्हणून ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र 39 वर्षानंतरही येथील संंतपीठ वनवास सुरू असल्यामुळे याठिकाणी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी वारकरी संप्रदायातील वारकरी, फडकरी, महाराज मंडळींनी शासन दरबारी आंदोलन केले. आता मात्र मंत्री संदीपान भुमरे यांनी कुठल्याही परिस्थितीत अभ्यासक्रम सुरू करायचा म्हणून मंत्री उदय सामंत यांनी पैठण येथे आणून संतपीठ प्रश्न मार्ग लावण्याचा ठरविले.

स्व.गोपीनाथ मुंडे ग्रा. वि. संस्थेला भरीव निधी देणार
मराठवाड्याच्या विकासाची तळमळ असलेले स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने तत्कालीन सरकारने ग्रामीण विकास संस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा देखील झाली होती. मात्र प्रत्यक्षात निधी न मिळाल्याने ही संस्था पूर्णत्वाकडे नेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. लवकरच आमच्या सरकारच्या कार्यकाळात निधी उपलब्ध करून स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने ग्रामीण विकास संस्था पूर्णत्वाकडे नेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाणार असल्याची माहिती यावेळी उदय सामंत यांनी दिली आहे.

Tagged