ustod-majur-melava-suresh-d

संपात फूट पाडणार्‍या मुकादमाचे पाय धुवून पिणार- आ. सुरेश धस

आष्टी केज न्यूज ऑफ द डे बीड

गांधीगिरी : आष्टीत आ. सुरेश धस यांच्याकडून ‘कोयता बंद’ची हाक

एकाही मजुरांना कोरोना होणार नाही, एवढी जिगर अन् ताकद मजुरांमध्ये

अक्षय मुंदडांनीही घेतली ऊसतोड मजुरांची बैठक

– मजुरीमध्ये दिडशे टक्के वाढ करा.
– चर्चेला शरद पवार असतील तरच बैठक घ्या.
– मुकादमांना गुन्हे दाखल होण्यापासून संरक्षण द्या.
– ऊसतोड मजूर महिलांसाठी आरोग्य सुविधा निर्माण करा.

आष्टी, दि.3 : साखर कारखान्यांचा नफा आणि ऊस तोडणी मजूर आणि मुकादम, वाहतूकदार यांना मिळणारे पैसे याचा हिशोब करण्याची वेळ आली आहे. एकदा हे होऊन जाऊ द्या, असा सज्जड इशारा देत या संपात फूट पाडणार्‍या एखाद्याने मुकादम आणि मजूर पाठवण्याचा प्रयत्न केल्यास पहिल्यांदा त्याचे पाय धुवून पाणी पिऊन सत्कार करू, दुसर्‍यांदा त्याने असा प्रयत्न केल्यास त्याचा योग्य बंदोबस्त करू, असा प्रकार होत असल्यास आम्हाला फोन करा आणि दोन हजार रुपये मिळवा असे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले.

आष्टी येथील गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी मजूर, मुकादम संघटना, ऊसतोडणी कामगार, वाहतूक व मुकादम संघटना, भारतीय जनता पार्टी, आ.सुरेश धस मित्र मंडळ आष्टी, पाटोदा, शिरूर आयोजित उसतोड मजुर मुकादम संघटना बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दगडू वनवे, आदिनाथ सानप, सुखदेव सानप, भाऊसाहेब आंधळे, तात्यासाहेब हुले, विष्णुपंत जायभाये, सुरेश वनवे, कल्याण पोकळे, रमेश ढगे तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मुकादम सोपानराव बांगर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की, ऊसतोडणी कामगार आणि मुकादम, वाहतूकदार यांचे परम दैवत असणारे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या मजुरांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. ऊस तोडणी दरामध्ये वेळोवेळी वाढ केली. त्यांच्या एका इशार्‍यावर ऊसतोडणीचे काम ठप्प होत असे. त्यांच्या कार्याप्रमाणे पंकजाताई मुंडे आणि खा. प्रीतमताई मुंडे काम करत आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता आपण सर्वांनी काम केले पाहीजे. वर्षानुवर्षे साखर सम्राटांनी ऊस तोडणी मजुरांचा घामावर करोडो रुपयांचे इमले उभे केले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील या कारखानदारांनी मजुरांची, मुकादमाची पिळवणूक केली आहे. स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी गोरगरीब गरजू माणसांचे विशेषतः महिला वर्गाचे जीवन उध्वस्त करण्याचे काम केले असून यावर्षी सुगी चांगली आहे. पंतप्रधान मोदी साहेबांचे अन्नधान्य मिळत आहे. गावातच पुरेसा रोजगार मिळू शकतो.‘कोयता बंद’ चा अंतिम निर्णय पंकजाताईसाहेब मुंडे याच घेणार आहेत. ऊसतोडणी मजुरांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांचे जीवनमरणाचा प्रश्न आहे. गावातून बाहेरगावी जाऊन स्थलांतरित जीवन जगताना कारखाना परिसरात अनेक ठिकाणी शौचालये नाहीत. त्यामुळे महिला मजुरांची कुचंबणा होते. हजारो महिला मजुरांच्या किडन्या खराब झाल्या आहेत. पोटदुखीचा विकार जडला आहेत. त्यांच्या आरोग्यच्या सुविधा निर्माण करा, अशी मागणीही आ.धस यांनी केली.

सध्याचा ऊसतोडीचा दर हा किमान वेतन कायद्याप्रमाणे मिळणार्‍या मजुरीच्या अर्धाच आहे. त्यामुळे दीडशे टक्के वाढ मिळावी अशी आपली मागणी आहे. नाक दाबलं तरच तोंड उघडणार आहे. सुरुवातीपासून आपण या मजुरांच्या बाजूने भक्कमपणे उभे आहोत. प्रतिटन एक हजार रुपये भाव मिळालाच पाहिजे. प्रत्येकवेळी लवादाच्या बैठकीला हजर होतो. राष्ट्रवादी पक्षाचा आमदार असतानाही मुंडे साहेबांचा आदर ठेऊन त्यांचे म्हणण्याप्रमाणेच निर्णय घ्यायचो, त्यांच्या अगोदर कोणतेही वक्तव्य केले नाही. उसतोड कामगारांच्या बारा संघटना आहेत. त्या सर्वांनी एक होण्याची वेळ आली आहे. कारखानदारांना मिळणारा साखरेचा दर, बगॅस, मळी, पूरक उत्पादन, इथेनॉल, सॅनिटायजर यातून मिळणार्‍या उत्पन्नाची आणि ऊसतोड कामगारांना मिळणारे पैसे याचा ताळमेळ करा मुकादमाचे कमिशन दुप्पट केले तरच परवडणार आहे. मुकादमांना कायदेशीर संरक्षण नाही. कारखानदार ट्रक मालकांना वेठीस धरतात. मुकादम मजुरांना धरतात. परंतु मजूर उचल घेऊन पळून गेल्यास आणि त्यास काही केले तर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे मुकादमांना संरक्षण द्या. कारण पैसे जाऊन आत्महत्येची वेळ त्यांच्यावर येत आहे. अनेक मुकादमांनी आपले जीवन संपवले आहे. मागील हंगामामध्ये कोरोना काळातही कारखाने चालू ठेवले, आणि काम झाले की मजूर काढून दिले. वाटेत त्यांचे बेहाल केले, पोलिसांनी मारहाण केली. त्यांना जाब विचारल्यावरून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. हे माझे भाग्य आहे असे मी समजतो. एकाही मजुराला कोरोना होणार नाही एवढे जिगर आणि ताकद मुजरामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला मजुरांमध्ये दीडशे टक्के वाढ जाहीर केल्याशिवाय निघायचे नाही. यंदा जयंत पाटील ऐवजी शरद पवार चर्चेत असतील तरच बैठक घ्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला आष्टी तालुक्यातील मुकादम आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

अक्षय मुंदडांनीही घेतली ऊसतोड मजुरांची बैठक

केज, दि.3 : केज विधानसभा मतदार संघात येणार्‍या, केज, अंबाजोगाई व बीड तालुक्यातील ऊसतोड मजूर आणि मुकादमाची बैठक भाजपाचे युवानेत अक्षय मुंदडा यांनी गुरुवारी दुपारी केज येथील वसुंधरा आश्रम शाळेत बोलावली होती.
यावेळी बोलताना लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार केशवदादा आंधळे म्हणाले, ऊसतोड मजुरांच्या संपाची अधिकृत घोषणा करण्याचा अधिकार हा भाजपाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना राहील. ताईच्या आदेशाशिवाय बीड जिल्ह्यातील एकही ऊसतोड मजूर आपले गाव सोडणार नाही. त्यांच्या या अवाहनाला उपस्थित सर्व ऊसतोड मजूर आणि मुकादमांनी त्यांच्या या घोषणेला टाळ्या वाजवून एकमुखी पाठिंबा दिला.
या बैठकीसाठी अक्षय मुंदडा यांच्यासह मुकादम संघटनेचे नेते गोरक्षनाथ रसाळ, भाजपाचे जेष्ठ नेते सुनीलआबा गलांडे पाटील, सर्जेराव वाघमोडे, दत्तोबा भांगे, सर्जेराव डोईफोडे, भाजपा तालुका अध्यक्ष भगवान केदार, डॉ वासूदेव नेहरकर, जि.प.सदस्य भारत काळे, राणा डोईफोडे, सुरेंद्र तपसे, दत्ता धस, सुदाम पाटील, सुनील घोळवे, राहूल गदळे, शिवाजी पाटील, सुरज पटाईत, लिंबराज फरके, बाबुराव घुले, वैभव ठोंबरे, केज तालुका मुकादम संघटनेचे अध्यक्ष गोविंद चाटे, महादेव बडे, महादेव तोंडे, अर्जून तिडके, अभिमान चौरे, जयदेव चाटे, उद्धव दराडे, माणिक लांब, हनुमंत नागरगोजे, पांडुरंग भांगे, शिवाजी बिक्कड, नामदेव आंधळे, डॉ श्रीधर चौरे, डॉ संभाजी वायबसे, दत्ता तोंडे, भिमराव केदार, रामभाऊ मिसाळ, महादेव केदार, हनुमान केदार, देविदास तोंडे, शरद चाटे, मधुकर कोरडे, बाबासाहेब कोरडे, भाऊराव घाडगे, लक्ष्मण चौरे, रामराव मोराळे यांचेसह केज विधानसभा मतदार संघातील ऊसतोड मुकादम, व मजूर मोठ्या संख्येने व सामाजिक अंतराचे पालन करून हजर होते.

Tagged