अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍या चुलत भावाचा खून

क्राईम न्यूज ऑफ द डे

पैठण दि.16 : चुलत भावजयी सोबत सुरू असलेल्या अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या चुलत भावाचा दोन महिन्यापूर्वी डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेतात खड्डा खोदून पुरुन टाकला. मात्र शेती मशागत सुरु असताना मृतदेह उघडा पडला. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलीस व ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने उलगडा केला असून आरोपी दिर व भावजयीला अटक केली आहे.
पैठण तालुक्यातील बालानगर येथील शिवारातील राधाबाई भाऊसाहेब घोंगडे यांच्या शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पुरुन ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या सपोनि अर्चना पाटील यांना गुरुवारी मिळाली. त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांना माहिती देऊन घटनास्थळाची पाहणी केली. ग्रामीण गुन्हे अन्वेषण पथकाला पाचारण केले. शुक्रवारी सकाळी नायब तहसीलदार कमल मनोरे, मंडळाधिकारी भावरे यांच्या उपस्थितीत सदरील मृतदेह पंचनामा करून बाहेर काढण्यात आला. यासंदर्भात ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गुप्त माहिती काढून मयत व्यक्ती संदर्भात माहिती घेतली. सदरील मृतदेह हा बालानगर येथील रघुनाथ घोंगडे (वय 30) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या पथकाने तात्काळ मयतचा चुलत भाऊ दत्तात्रेय उर्फ शिवाजी जगन्नाथ घोंगडे (वय 40) यास बालानगर येथून ताब्यात घेतले. व त्याला बोलते केले. त्याने सांगितले की, माझी चुलत भाऊजयी यशोदा रघुनाथ घोंगडे (वय 25 रा.बालानगर) हीच्या सोबत गेल्या अनेक दिवसापासून अनैतिक संबंध होते. याची माहिती रघुनाथला झाली. त्यामुळे तो दररोज यशोदाला मारहाण करायचा. आमच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरणार्‍या रघुनाथला कायमचे संपवायचे असं आम्ही ठरविले. त्यानुसार मकर संक्रातीच्या आठवड्यापूर्वी रघुनाथ यास गोड बोलून शेतामध्ये झोपण्यासाठी सांगितले. भाऊजयी यशोदाला गावातून शेतामध्ये आणले. निवांत झोपलेल्या रघुनाथच्या डोक्यात मोठा दगड घातला. यावेळी यशोदा देखील लाकडाने मारहाण केली. त्यामुळे जागेवरच रघुनाथ मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने शेतामध्ये पुरून टाकल्याची माहिती दिली. परंतु सदरील शेतीची मशागत करता वेळेस हे प्रकरण उघडकीस आले. ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक संदीप साळुंखे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अर्चना पाटील, मंचरे, जावळे, प्रमोद खांडेभराड, किरण गोरे, पोना नरेंद्र, संजय भोसले, संजय तांदळे, पदमा यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला आहे.

Tagged