remdesivir

बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपला!

कोरोना अपडेट बीड

बीड, दि. 17 : बीडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपलेला आहे. आज सकाळपासून जिल्हा रुग्णालयातून एकही इंजेक्शन कुणाला वाटप केलेले नाही. जिल्ह्याला हा स्टॉक कधीपर्यंत येईल याचं कुणीही समाधानकारक उत्तर देत नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस तरी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना जिल्ह्याबाहेरून इंजेक्शन उपलब्ध करावे लागणार आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ते उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची गैरसोय झाली आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानकडून 10 हजार इंजेक्शन जिल्ह्यासाठी उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनानेही मागील आठ दिवसांपुर्वीच 10 हजार इंजेक्शन खरेदी करण्यासाठी आगावू रक्कम दिलेली आहे. मात्र कंपन्यांकडूनच शॉर्टेज असल्याने या दोन्ही ऑर्डर जिल्ह्याला कधीपर्यंत मिळतील हे कोणीच सांगू शकत नाहीत. आज बीड जिल्ह्यासाठी 40 इंजेक्शन प्राप्त झाले होते. मात्र अत्यावश्यक रुग्णांनाच त्याचा वापर करावा, अशा सुचना प्रशासनाला दिल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी सांगितले.

सोमवार पर्यंत इंजेक्शन उपलब्ध होण्याची आशा
दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात सामान्य माणसांचा त्रास होत आहे. बीड जिल्ह्यात ला सोमवारपर्यंत 1000 इंजेक्शनचे डोस मिळतील, अशी आशा आहे.

Tagged