एकनाथ शिंदेंसोबत 37 आमदार, सगळ्यांचे चेहरे कॅमेर्‍यात कैद

न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

बीड, दि.22 ः एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार याचा संपूर्ण उलगडा रात्रभर घडलेल्या नाट्याने झालेला आहे. सुरतमधून या आमदारांना विमानतळावर घेऊन जात असताना प्रसिध्दी माध्यमांच्या कॅमेर्‍यांनी एका एका आमदारांचा चेहरा टिपला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे एकूण 33 आमदार आणि बच्चू कडू व त्यांचा आणखी एक आमदार असे मिळून 35 आणि दोन इतर अपक्ष आमदार असे मिळून 37 आमदारांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. तर आणखी पाच आमदार आपल्या संपर्कात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. रात्री पावणेचारच्या सुमारास सर्व आमदारांना घेऊन सुरत एअरपोर्टवरून उड्डाण केले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेना आमदारांनी बंड केलेले नाही, आम्ही कुठल्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. बाळासाहेबांच्या हिंदूत्वाच्या विचाराला आम्ही कसल्याही प्रकारे आम्ही फारकत घेणार नाही. हिंदूत्वाच्या मुद्यावर आणि धर्मवीर आनंद दिघें साहेबांच्या विचारावर कुठल्याही आमदारांनी फारकत घेतलेली नाही. आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळासाहेबांनी देशाला हिंदूत्वाचा विचार दिलेला आहे. त्यामुळे गर्व से कहो हम हिंदू है, असा नाराही त्यांनी यावेळी दिला.

बंडामागे भाजपची शक्ती
एकनाथ शिंदेे यांच्या बंडामागे भाजपची शक्ती असल्याचे दिसत आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी मुंबईहून सुरत गाठणे, गुजरात सुरु होताच गुजरात पोलीसांचे संरक्षण मिळणे, सुरत भाजपा प्रदेशाध्यक्षांनी त्यांची पूर्ण व्यवस्था करणे, नेमक्या त्याचवेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.भागवत कराड, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सुरतमध्ये असणे, शिवसेनेचे अनिल परब यांना ईडीने चौकशीकामी दिवसभर बसवून ठेवणे, त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणे, आणि आता या आमदारांना सुरतहून तीन खासगी विमानांनी गुवाहाटीला घेऊन जाणे, त्यासाठी भाजपचे आमदार संजय कुटे, रविंद्र चव्हाण आणि मोहित कंबोज हे सगळे जण याची व्यवस्था पाहत असल्याचे कॅमेर्‍यापासून लपून राहीलेले नाही.

नाव हिंदूत्वाचे परंतु सगळ्यांना भिती ईडी, सीबीआयची
शिवसेनेचे सगळे आमदार आम्ही हिंदूत्वाच्या विचारावर हे बंड केल्याचे सांगत आहेत मात्र बंड केलेल्या अर्ध्याहून अधिक आमदारांच्या मागे यापुर्वी ईडी, सीबीआय आणि केंद्राच्या इतर तत्सम संस्थांनी चौकशी सुरू केलेली आहे. दरम्यान मातोश्रीच्या अत्यंत जवळच्या यामिनी जाधव यांचे पती आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यामागे सध्या ईडीचा समेमिरा लागला आहे. यापूर्वी ईडी आणि आयकर विभागाकडून त्यांची अनेकदा कसून चौकशी करण्यात आली असून त्यांच्यावर अटकेचीही टांगती तलवार आहे. त्यामुळे यामिनी जाधव ईडीच्या भीतीने शिंदे यांच्या बंडात सहभागी झाल्या का असा सवाल विचारला जात आहे. आता या बंडात अनिल परब यांचा समावेश झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

नवा गट स्थापन करण्यासाठी 36 आमदारांचा कोटा पूर्ण
एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरून उचलबांगडी करण्यात आली असली तरी एकनाथ शिंदे यांनी 37 आमदारांनी एका कागदावर सही केल्याबाबतचा एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मोठी अडचण होणार आहे. आपण शिवसेना सोडली नाही आाणि सोडणार देखील नाही, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे भाजपासोबत जाणार
दरम्यान शिवसेनेकडून रात्रीतून कुठलीही भुमिका जाहीर केलेली नाही. परंतु संपूर्ण परिस्थिती शिवसेनेच्या हातातून निसटल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सोबतचे सर्व आमदार भाजपासोबत जाऊन सरकार स्थापन करतील, असे दिसत आहे. कालच एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सरकार स्थापन करा, असे मुख्यमंत्र्यांना कळवले होते.

सकाळी सव्वा सहा वाजता आमदार गुवाहाटीला पोहोचले
दरम्यान रात्रंभर सुरू असलेल्या ड्राम्यानंतर शिवसेनच्या सर्व बंडखोरांना घेऊन विमान सकाळी सव्वा सहाच्या सुमारास गुवाहाटीला पोहोचले आहेत. आसाम पोलीस कडेकोट बंदोबस्तात सर्व आमदारांना घेऊन हॉटेलला पोहोचत आहेत. त्यासाठी तीन लक्झरी बसेस कार्यरत आहेत. मोहित कंबोज, संजय कुटे, चव्हाण हे भाजपचे लोक तैनात आहेत.


Tagged