rathod mukadam

बेपत्ता अंकुश राठोड यांचा नात्यातील व्यक्तीकडून खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

फुलेपिंपळगाव  दि.3 ः मागिल एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या मुकादमाचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अटक केलेल्या आरोपीने खुनाची कबुली देत मृतदेह सांगवीच्या गोदावरी नदीत फेकल्याचे सांगितले. दोन दिवसापूर्वी नदीपात्रात दुचाकी सापडली असून मृतदेहाचा पोलीस शोध घेत आहेत.
माजलगाव तालुक्यातील केसापुरी तांडा येथील मुकादम अंकुश भाऊराव राठोड (वय-45) हे दुचाकीवरुन (एम.एच.23 ए.एल.9274) 1 नोव्हेंबर 2020 रोजी एका वाहकाला ऊसतोडणीसाठी आणायला वादुर फाटा (ता.परतुर जि.जालना) येथे गेले होते. ते पुन्हा परतले नाही. याप्रकरणी शोध घेवुनही ते मिळून न आल्याने माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दि.2 नोव्हेंबर रोजी मुकादम अंकुश राठोड हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. सदरील प्रकरणाचा तपास आष्टी पोलिसाकंडे देण्यात आला होता. यामध्ये पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या नात्यातीलच एकनाथ रामेश्वर चव्हाण, महादेव रुपचंद चव्हाण, सुनिता एकनाथ चव्हाण यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा त्यांनी अंकुश राठोड यांचा खून केल्याची कबुली दिली. तसेच मृतदेह सांगवी येथील गोदावरी नदी पात्रात कपड्यात गुंडाळून फेकुन दिल्याचे सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना राठोड यांची दुचाकी आढळून आली. मात्र अंकुश राठोड यांचा मृतदेह सापडला नसून शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपीवर 365, 364 व वाढीव गुन्हा 302 प्रमाणे आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत चप्पूच्या साह्याने शोध सुरु होता.

Tagged