विद्यार्थी अपघात विमा योजना ‘आयसीयू’मध्ये!

न्यूज ऑफ द डे बीड

सरकारी कर्मचार्‍यांना उदासिनतेची लागण
बीड : एखादी योजना आहे अन् ती थेट लाभार्थ्यांना लाभ देत असेल तर त्या योजनेला सरकारी कर्मचार्‍यांच्या उदासिनतेची लागण झाल्याशिवाय रहात नाही. अशा एक सरकारी योजना सध्या आयसीयूमध्ये दाखल झालेली आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास अथवा अपघातात विद्यार्थी मृत झाल्यास राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने ‘राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान’ या योजनेद्वारे सुरक्षा कवच दिलेले आहे. परंतू ही योजना राबिवण्यात जिल्हा प्रशासनाला काडीचाही इंटरेस्ट दिसून येत नाही. योजनेबद्दल जनजागृती केली जात नाही. जे पालक जागरूक आहे त्यांनी या योजनेचे प्रस्ताव दाखल केले मात्र 2019-20 पासून पात्र लाभार्थ्यांना अनुदान वितरीत झालेले नाही. तर यावर्षीच्या प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाकडून मान्यताच देण्यात आलेली नाही.
सन 2020-21 या वर्षात राज्यातील 485 विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी राज्याकडून 360 लाखांचा निधी या वित्तीय वर्षात वितरित करण्यास मान्यता दिली आहे. मात्र बीड जिल्ह्यात योजनेबद्दल जनजागृती केली जात नाही. शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यासह योजनेसंदर्भात प्रचंड उदासीनता दिसून येते. या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष 2019-2020 मध्ये शिक्षण विभागाकडे फक्त 25 प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावांना 30 डिसेंबर 2019 बैठकीत मान्यता दिली आहे. याकरिता शासनाकडे तब्बल 18 लाख 50 हजार रूपयांची मागणी प्रस्तावित केलेली आहे. परंतू आजतागायत प्रस्ताव दाखल करणार्‍या पालकांना छदामही मिळालेला नाही. त्यातच शिक्षण विभागाकडे शैक्षणिक वर्ष सन 2020-2021 मध्ये आजपर्यंत 26 प्रस्ताव दाखल झाले आहेत. या करिता 19 लाख 50 हजार रुपये निधी लागणार आहे. परंतू, या प्रस्तावांना जिल्हास्तरावरूनच मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे दाखल सर्वच प्रस्ताव प्रशासनाच्या उदासिनतेमुळे प्रलंबित आहेत. मागील आर्थिक वर्षापासून या योजनेसाठी निधी मिळालेला नाही. त्यामुळे सन 2019-2020 मधील मंजूरी मिळालेले 25 प्रस्तावाचे पालक व 2020-2021 मध्ये प्रस्ताव दाखल करणारे 26 पालक असे जवळपास 51 पालक या योजनेच्या अनुदानासाठी प्रतीक्षेत आहेत. ही योजना राबविण्यासाठी शिक्षण विभागाने अंग झटकून कामाला लागण्याची गरज असून जिल्हा प्रशासनाकडूनही मोठ्या प्रमाणावर जनजागृती आवश्यक आहे.
जनजागृती करून अनुदान रकमेत वाढ व्हावी यासाठी प्रयत्न करणार-मनोज जाधव
प्रत्येक आई-वडिलांना त्यांची मुले प्रिय असतात. एखाद्या मुलाचा अपघात किंवा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या आईवडिलांची हानी ही न भरून निघणारी असते. परंतू आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पालकांना त्यांच्या मुलाच्या अपघाती खर्चासाठी किंवा मृत्यू मृत्यूपश्चात मिळणारी रक्कम ही त्या कुटुंबाला आधार देणारी ठरते. येणार्‍या काळात या योजनेची जागृती करून या योजनेतून जास्तीत जास्त गोरगरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल पालकांना लाभ मिळून देण्यासाठी आपण काम करणार आणि या योजनेच्या अनुदानाच्या रकमेत आणखी वाढ व्हावी यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना सांगितले.
योजनेसाठी पात्रता
विद्यार्थी शिकत असलेली शाळा ही राज्यातील व सर्व शिक्षण, कृषी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यासह आदी विभागातील शासन मान्यताप्राप्त असावी. इयत्ता 1 ते 12 पर्यंत शिकणारा मुलगा अथवा मुलगी या योजनेसाठी पात्र आहे.
यासाठी अपघातांसाठीच मिळते अनुदान
अपघातामुळे कायमचे अपंगत्व (1 अवयव किंवा 1 डोळा कायम निकामी) झाल्यास रूपये 30 हजार रूपयाचा लाभ दिला जातो. कायमचे अपंगत्व (2 अवयव किंवा 2 डोळे किंवा 1 अवयव किंवा 1 डोळा निकामी) आल्यास रु. 50 हजार रूपयाचा लाभ दिला जातो. अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रूपयांचा लाभ दिला जातो. मात्र आत्महत्येचा प्रयत्न करणे, जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे, अंमली पदार्थ किंवा नशील्या पदार्थाच्या सेवनामूळे झालेला अपघात, मोटारसायकल शर्यतीतील अपघात या घटनात मयतांना व जखमींना याचा लाभ मिळत नाही.
अपघात सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी पालकांना आवश्यक कागदपत्रे
जर विद्यार्थी अपघाताने मृत्यू पावल्यास प्रथम खबरी अहवाल (एफआयआर), स्थळ पंचनामा, तपास पंचनामा, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रती स्वाक्षरीत केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला (जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रति स्वाक्षरीत केलेले, जर विद्यार्थ्यास कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास) अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र शल्यचिकित्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायम अपंगत्वाचे प्रमाणपत्र) आवश्यक आहे.

सन 2019-2020 मधील प्रस्ताव आकडेवारी
पाण्यात बुडून 11
सर्पदंश 02
अपघात 03
विद्युत शॉक 02
डोक्याला मार 06
कायम अपंगत्व 01
एकूण 25

सन 2020-2021 मधील प्रस्ताव आकडेवारी
पाण्यात बुडून 10
जाळून/भाजून 01
अपघात 07
विद्युत शॉक 03
डोक्याला मार 02
खदानीत स्फोट 02
अन्य कारणांमुळे 01
एकूण 26

Tagged