परळी, दि. 6 : पुजा चव्हाण मृत्यू प्रकरण महाराष्ट्रात गाजत असताना पुजा चव्हाण हीच्या बहीणीचा मोबाईलच एका तरुणीने पळविल्याची घटना 4 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता परळीतील फाऊंडेशन शाळेजवळ घडली. ‘तुझ्या बहिणीबद्दल बोलयाचे आहे’ असे सांगून पूजा चव्हाणच्या बहिणीला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका युवतीने तिच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. सदर तरुणीचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, पुजाची बहिण दिव्यांगा ही दहाव्या वर्गात शिकत आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभ कराड हे दोघे परळीतील हनुमान गड परिसरात गेले होते. त्यावेळी दिव्यांगाला एका अनोळख्या क्रमांकावरून फोन आला. तीने पूजा चव्हाणच्या मृत्यूबद्दल काही तरी बोलायचे आहे, असं सांगितलं. त्यानंतर दिव्यांगा आणि सौरभ हे दोघे फाऊंडेशन शाळेजवळ पोहोचले. त्यावेळी अनोळख्या तरुणीने पुन्हा एकदा फोन करून दोघांना शाळेच्या दुसर्या गेटजवळ बोलावले. दिव्यांगा फोनवर बोलत येत असताना समोरून आलेल्या अनोळख्या तरुणीने अचानक तिच्या हातातून मोबाईल हिसकावला आणि पळ काढला. सौरभ आणि दिव्यांगाने तिचा पाठलाग केला. पण, काही अंतरावरच अनोळखी तरुणी एका तरुणाच्या दुचाकीवर बसून फरार झाली. दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे गुढ अद्याप उकलले नाही. त्यातच तिच्या बहिणीचा मोबाईल अज्ञात तरुणीने हिसकावून नेल्यामुळे खळबळ उडाली आहे. दिव्यांगाला बोलावून मोबाईल चोरण्याचा हेतू नेमका काय होता? मोबाईल चोरी करणारी तरुणी कोण होती? त्या मोबाईलमध्ये नेमकं काय दडलंय असे अनेक सवाल या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. घडलेल्या घटनेनंतर दिव्यांगा आणि सौरभ यांनी परळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
