बायपासच्या पंख्यासाठीचा मुरुम टाकला खाजगी बांधकामावर!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


पासचा गैरवापर केल्यामुळे बीड तहसीलदारांची टिप्परवर कारवाई
बीड
दि.13 : येथील बायपास टू बायपास या रस्त्यावरील साईड पंखे मुरुमाने भरण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र या परवानगीचा गैरवापर करत साईड पंखे भरण्याचे सोडून एका टिप्पर चालकाने खाजगी बांधकामावर मुरुम टाकल्याचे दिसून आले. या प्रकरणी बीड तहसीलदार सुरेंद्र डोके यांनी सदरील टिप्परवर कारवाई करत टिप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात लावला आहे.

राष्ट्रीय महामार्ग 52 सोलापूर-धुळे च्या बीड शहरातून गेलेल्या बायपास टू बायपासचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहेत. पंखे मुरुमाने भरुन लेव्हल करण्यासाठी दिलेल्या परवानगीची व वाहतूक पासचा अनाधिकृतरित्या गैरवापर होत असल्याचे तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्या निदर्शनास आले. रविवारी (दि.13) शहरातील स्वराज्य नगर भागामध्ये एका बांधकामावर मुरुम टाकतांना टिप्पर (एमएच-23 डब्लू-4009) आढळून आला. या प्रकरणी तहसीलदार डोके, तलाठी जगन्नाथ राऊत यांनी हा टिप्पर शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाथारकर, गायकवाड यांच्या मदतीने जिल्हाधिकारी कार्यालयात लावला आहे. असून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. चालक दत्ता खरात यांच्याकडे चौकशी केली असता सदरील टिप्पर भाऊसाहेब खांडेकर यांचा असल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणी हायवे कंत्राटदारासही नोटीस देण्यात आली आहे.

Tagged