गेवराई दि.13 : तालुक्यातील शहाजानपुर चकला येथे वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये बुडून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी गेवराई पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध नदीपात्रात अवैध वाळू उपसा केल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एका आरोपीच्या शनिवारी (दि.12) रात्री पाचोड परिसरातून गेवराई पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
गेवराई तालुक्यातील शहाजानपूर चकला येथील चार चिमुकल्यांचा सिंदफना नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी ग्रामस्थांनी नदीपात्रातच ठिय्या मांडला होता. त्यानंतर महसूल व पोलीस प्रशासनाने नदीपात्रात जावून कारवाईचे ग्रामस्थांना लेखी आश्वासन दिले होते. मात्र चार दिवसानंतर मयताचे नातेवाईक असाराम पांडूरंग इनकर यांच्या फिर्यादीवरुन वाळू माफिया पांडुरंग चोरमले, विलास निर्मळ, संदीपान निर्मळ आणि अर्जुन कोळेकर (सर्व रा.तांदळवाडी ता.बीड) या चौघांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात कलम 304, 389, 34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संदिपान हानुमान निर्मळ (वय 28) हा पाचोड परिरसरात असल्याची माहिती तपास अधिकारी सपोनि.संदिप काळे यांना मिळाली. त्यास शनिवारी रात्री ताब्यात घेतले. रविवारी त्यास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर फरार तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.