beed jilha parishad

जि.प.च्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात; ऑगस्टमध्ये लोकार्पण

न्यूज ऑफ द डे बीड

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून पाहणी; 25 जुलै रोजी ठरणार लोकार्पणाचा मुहूर्त

बीड : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे अंतर्गत काम अंतिम टप्प्यात असून युद्धपातळीवर सुरु आहे. या इमारतीचे लोकार्पण ऑगस्ट महिन्यातच होणार असल्याचे निश्चित आहे. परंतू, ऑगस्टच्या सुरुवातीस की अखेरला हे अद्याप ठरलेले नसून लोकार्पणाचा मुहूर्त 25 जुलै रोजी ठरणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या अंतर्गत कामाचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार हे दरदिवशी आढावा घेत आहेत. याच अनुषंगाने त्यांनी शुक्रवारी (दि.16) इमारतीस भेट देऊन पाहणी केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम हाळीकर, स्थानिक अभियंता तसेच, स्थापत्य, विद्यूत पुरवठा, फर्निचर कामाचे कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी कुंभार यांनी जिल्हा परिषदेच्या कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. प्रलंबित कामे गतीने करून घ्यावीत. तसेच, विद्यूत पुरवठा व फर्नीचरची कामे समन्वयाने आणि दर्जेदार करावीत अशा सूचना केल्या आहेत. हे काम अंतिम टप्प्यात असून युद्धपातळीवर सुरु आहे. या इमारतीच्या लोकार्पणाचा मुहूर्त 25 जुलै रोजी ठरणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन दरदिवशी आढावा घेत आहे.

उपमुख्यमंत्र्यांची लाभणार उपस्थिती
उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्याचे नियोजन आहे. पवार यांनी 30 जुलै व 5 ऑगस्ट या तारखा ही दिल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. परंतू, अनेक किरकोळ कामे प्रलंबित असल्याने पवार यांनी दिलेल्या वेळेत लोकार्पण होण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी 25 जुलै रोजी लोकार्पणाचा मुहूर्त ठरणार असून ऑगस्ट महिन्यातच लोकार्पण होईल असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांनी म्हटले आहे.

नवीन इमारतीत 11 विभागांचे स्थलांतर
नवीन इमारतीत सुरुवातीस दोन मजले कार्यान्वित करण्यात येणार आहेत. यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, जिल्हा परिषद महिला सदस्यांसाठी कक्ष, सभागृह असणार आहे. तसेच, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत व सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता बांधकाम 1 व 2, मुख्य लेखाधिकारी यांचे 5 विभाग सुरुवातीस स्थलांतरीत केले जात आहेत. परंतू, तळमजल्यासाठी फर्नीचर मंजूर नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निधीतून काम करण्याची तयारी सुरु आहे. सध्या काम होणार नसून त्याठिकाणी 6 विभाग स्थलांतरित केले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.

Tagged