बीड दि.29 : बीडचे विद्यमान आमदार संदिप क्षीरसागर यांच्यावर अभियांत्रिकेचे शिक्षण घेत असताना 2001 साली उत्तरपत्रिका बदलल्याबाबत दाखल गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातून आ.क्षीरसागर यांची अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर. शिंदे यांनी सबळ पुराव्यांअभावी बुधवारी निर्दोष मुक्तता केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ.माधव गुमास्ते यांनी 25 सप्टेंबर 2001 रोजी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. 12 ते 13 सप्टेंबर 2001 दरम्यान विद्यापीठातील बॅडमिंटन हॉलमध्ये ठेवलेल्या अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकांपैकी 111080 या क्रमांकाची उत्तरपत्रिका कोणी तरी चोरून त्याजागी बनावट उत्तरपत्रिका ठेवल्याची माहिती पहारेकर्याने त्यांना दिली होती. बदललेली उत्तरपत्रिका क्षीरसागर या विद्यार्थ्याची होती. या प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक एस. बी. शिरसाठ यांनी 12 मे 2003 ला दोषारोपपत्र दाखल केले होते. बॅडमिंटन हॉलभोवती कडेकोट बंदोबस्त होता. तेथे कोणीही जाऊ अथवा उत्तरपत्रिका बदलू शकत नव्हते. पहारेकर्याचा जबाब घेतला नाही. बदललेल्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षर संदीपचे नसल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आहे, आदी बचावांचे मुद्दे ग्राह्य धरून न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला. आ. संदिप क्षीरसागर यांच्यातर्फे अॅड. के.जी. भोसले यांनी काम पाहिले.