घाटनांदूर परिसरातील नुकसानीच्या पाहणीसाठी पथक शेतकर्‍यांच्या बांधावर

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे बीड

कार्यारंभ इम्पॅक्ट : जि.प.अध्यक्षपतींसह तहसिलदार पाटील यांनी केली पाहणी
घाटनांदूर दि.30 : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर परिसरातील पीक पाहणी करण्यासाठी कुठलाच लोकप्रतिनिधी प्रतिसाद देत नसल्याने परिसरातील शेतकर्‍यांत नाराजीचा सूर उमटत होता. या संदर्भात दैनिक कार्यारंभमध्ये ‘घाटनांदूर येथील नुकसानग्रस्त भागाकडे लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत गुरुवारी (दि.30) लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचा ताफा पाहणी करण्यासाठी या भागात दाखल झाला.
गेल्या चार दिवसांपासून पूर्ण जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. घाटनांदूर परिसरातील सर्व पिके पाण्यात गेली आहेत. उध्वस्त झाली आहेत. पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे. त्याला अश्रू अनावर होत आहेत;अशा परिस्थितीत त्याला धीर द्यायला कोणताच लोकप्रतिनिधी घाटनांदूर परिसरात पाय ठेवायला तयार नाही. संकटाच्या वेळी शेतकर्‍यांकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा का ? असा सवाल विचारला जात होता. गुरुवारी जि.प. अध्यक्षपती शिवाजी सिरसाट, तहसीलदार विपीन पाटील, मंडळ अधिकारी अंबाड, कृषी सहाय्यक दीपाली मुंडे, तलाठी अर्चना चव्हाण, ग्रामविकास अधिकारी महेश फड यांच्या पथकाने येथील शेतकर्‍यांच्या नुकसानीची पहाणी करून शेतकर्‍यांना दिलासा दिला. यावेळी येथील ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख आणि शेतकरी उपस्थित होते.

Tagged