जिल्हा परिषदेतील ‘त्या’ 793 शिक्षकांना मिळणार थकीत वेतन

बीड

बीड : जिल्हा परिषदेत अंतर जिल्हा बदलीने आलेल्या व वस्ती शाळेतील शिक्षकांचे समायोजन करण्यात आलेले शिक्षक 2014 मध्ये अतिरिक्त ठरले होते. 1 मार्च 2014 ते 30 नोव्हेंबर 2015 या कालावधीत कार्यरत असलेल्या व संच मान्यता उशिरा मिळाल्यामुळे वेतन न मिळालेल्या 793 प्राथमिक शिक्षकांचे थकीत वेतन अदा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार हे वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी दिली.

  राज्याच्या कानाकोपर्‍यातून 2012 नंतर मोठ्या प्रमाणात अंतर जिल्हा बदलीने शिक्षक बीड जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. तर 31 मार्चच्या शासन निर्णयानुसार अनेक वस्ती शाळेतील शिक्षकांचे प्राथमिक शिक्षक म्हणून समायोजन करण्यात आले होते. मात्र 1 मार्च 2014 ते 30 नोव्हेंबर 2015 मध्ये 793 शिक्षक हे अतिरिक्त ठरले होते. त्यामुळे या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे वेतन रखडले होते. शासन निर्णय व उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार  793 शिक्षकांच्या  थकीत वेतनासाठी  नियमानुसार पडताळणी करण्यासाठी जिल्हास्तरावर विशेष समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने आपला तपासणी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी 3 जून रोजी 793 शिक्षकाचे वेतन अदा करण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.

793 शिक्षकांची यादी व मंजूर वेतन याची सविस्तर यादी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेंच संबंधित 793 शिक्षकांनी यादीमधील स्वतःशी निगडित असलेल्या बाबीची खात्री करून घ्यावी. तसेंच थकीत वेतनाची अंतिम अदाई गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून होणार असून दि. 11 जून पर्येंत कालावधी निश्चित केलेला आहे. सदर प्रक्रिया मुदतीत व पारदर्शकपणे पार पाडण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीईओंनी गटशिक्षणाधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. याबाबत कोणतीही अनियमितता होणार नाही तसेच याबाबत तालुकास्तरावर कोणतीही तक्रार असेल तर मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचे आवाहन अजित कुंभार व शिक्षणाधिकारी अजय बहीर यांनी केले आहे.

सदर शिक्षकांचे थकीत वेतन उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार देण्यात येत आहे. येत्या आठ दिवसात सर्व शिक्षकांना थकीत वेतन अदा करण्याच्या सुचना गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत.

अजित कुंभार
सीईओ, जिल्हा परिषद बीड

Tagged