बीड सामाजिक वनीकरण विभागात सावळा गोंधळ

बीड


वनक्षेत्रपाल भारत लटपटेंविरोधात तक्रार

बीड : येथील सामाजिक वनीकरण विभागामध्ये सावळा गोंधळ सुरु असून वनक्षेत्रपाल भारत लटपटे हे मजूरीचे पैसे देत नसल्याची तक्रार मजूरांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे (दि.7) रोजी केली आहे. याप्रकरणाकडे लक्ष देऊन मजूरांचे वेतन तातडीने देण्याच्या सूचन आमदार क्षीरसागर यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

   तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागांतर्गत झालेल्या कामावरील मजूरांचे मजूरीचे पैसे न मिळाल्याची काही मजूरांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणात आमदार क्षीरसागर यांनी चौकशी करुन तातडीने मजूरांचे मजूरीचे पैसे अदा करावेत. हलगर्जी होऊ नये, तसे केल्यास कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या आहेत. याबाबत सामाजिक वनिकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी अमोल सातपुते यांनी म्हटले की, शासनाकडून निधी प्राप्त झालेला नाही. निधी येताच मजूरीचे पैसे वितरित करण्यात येतील असे सांगितले.
भारत लटपटे यांची कार्यपद्धती संशयास्पद
मजूरांच्या यादीची पडताळणी होण्याची गरज आहेत. यात काही बोगस नावे असण्याची शक्यता आहे. याशिवाय लटपटे यांच्या भागातील काही नातेवाईक देखील असल्याचा संशय मजूरांनी व्यक्त केला आहे. स्थानिक मजूरांना डावलून परजिल्ह्यातील मजूरांना कामावर दाखवणे या प्रकरणाची कसून चौकशी केल्यास लटपटे हे दोषी आढळतील, असेही विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.
बीड तालुक्यातील 1 हजार मजूर अडचणीत
लॉकडाऊन काळात अनेकजण अडचणीत आले आहेत. काम केलेले पैसे देखील मिळत नसल्याने मजूरांनी आमदारांकडे तक्रार केली आहे. बीड तालुक्यातील 1 हजार मजूरांचे पैसे देण्यात न आल्यामुळे अनेकजण अडचणीत सापडले आहेत.
नरेगाच्या कामात मजूरांची जास्त दाखवतात
नरेगा अंतर्गत वनक्षेत्रपाल भारत लटपटे यांच्या कार्यक्षेत्रात रोप वाटिका निर्मिती करण्यात आलेली आहे. पाली (ता.बीड) येथील रोप वाटिकेमध्ये नरेगा अंतर्गत काम करणार्‍या मजूरांची संख्या कमी असताना स्थानिक वनमजूरास हाताशी धरुन मजूर संख्या जास्तीची दाखवून (मस्टरवर) निधी लाटला जात आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, यापूर्वी लटपटेंच्या जागी असलेल्या अधिकार्‍याविरोधात अशाच भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई झालेली आहे.
उद्या भेटा, हे छापू नका : भारत लटपटे
मजूरांनी सांगितलेल्या माहितीवरुन मार्च पूर्वी झालेल्या कामाचे पैसे देखील निधी उपलब्ध असूनही देण्यात आले नाहीत. याउलट भारत लटपटे यांनी गंगाखेड (जि.परभणी) येथील त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने मोठ्या रक्कमेचे धनादेश अदा केल्याचे विभागातील सूत्रांनी सांगितले आहे. याबाबत त्यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले, काहीही उलट-सुलट करु नका, उद्या भेटा.. सविस्तर बोलू… हे छापू नका असेही त्यांनी ‘कार्यारंभ’शी बोलताना सांगितले आहे.


जे कामावर होते त्यांना मजूरी मिळाली आहे. तांत्रिक अडचणीमुळे काहीजण वंचित असू शकतात. याशिवाय काही ठिकाणी अंदाजपत्रकापेक्षा जास्त खर्च झालेल्या ठिकाणी मजूरीचे पैसे अदा होऊ शकले नाहीत. तसेच, कोठेही जास्तीचे मजूर दाखविले जात नाहीत. नियमाप्रमाणे काम सुरु आहे. कामावर येण्यासाठी दवंडी देण्यात येत असते.
-भारत लटपटे, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनिकरण, बीड

Tagged