ऊसतोड मजूर प्रश्न; पवारांचे मार्गदर्शन घ्या; धनंजय मुंडेंनाही बैठकीला बोलवा

न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र

बीड : संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे, कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे अशा शब्दात या संपात विनाकारण हस्तक्षेप करणार्‍यांना ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी सुनावले. प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार शरद पवार यांचे मार्गदर्शन घ्यावे. ऊसतोड कामगार महामंडळाकडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने धनंजय मुंडेंनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर असलेले आणखी मंत्री महोदय उदाहरणार्थ आरोग्य मंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजाताई मुंडेंनी केल्या. मजूरांना वाढ न दिल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्यातील ऊसतोड कामगारांना मजूरीच्या दरात सन्मानजनक वाढ मिळावी यासाठी ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी आज (दि.20) साखर कारखाना संघाच्या बैठकीत आग्रही भूमिका मांडली. पंकजाताई मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यातील ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या संघटनांकडून मागणी संदर्भातील आलेल्या निवेदनांवर यावेळी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील तमाम ऊसतोड मजूरांची मजूरीच्या दरात वाढ मिळावी आणि ही वाढ सन्मानजनकच मिळाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचाच होईल. तथापि, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजूरांना विमा कवच द्यावे, त्याची जवाबदारी राज्य सरकार व कारखान्यांनी घ्यावी. सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती आणि भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत. या दोन्ही समितीने त्यांचे म्हणणे लवादासमोर मांडावे व चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी खासदार शरद पवार यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना त्यांनी केली. ऊसतोड कामगारांच्या मजूरीत वाढ न झाल्यास कोयता चालणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Tagged