किरायाच्या घरातील गर्भपात सेंटरचा पर्दाफाश; दोघे ताब्यात डॉक्टर फरार!

बीड

गेवराई : किरायचे घर भाड्याने घेऊन त्या ठिकाणी अवैध गर्भपात केला जात असल्याची माहिती बीड जिल्हा शल्यचिकीत्सक अशोक बडे यांना मिळाली. त्यांच्या टिमने गुरुवारी (दि.4) सकाळी छापा मारत गर्भपातासाठी लागणारे साहित्य, मशनरी जप्त केल्या. तसेच एका महिलेसह तरुणाला ताब्यात घेतले तर एक आरोपी डॉक्टर फरार झाला आहे. ही कारवाई गेवराई शहरातील संजयनगर भागात करण्यात आली.

बबन चंदनशिव, मनीषा सानप या दोघांना ताब्यात घेतलेले आहे. काही महिन्यापूर्वीच शितल गाडे या महिलेच्या मृत्यूनंतर अवैध गर्भपात प्रकरण चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर आता गेवराई शहरात संजय नगर परिसरात अवैध गर्भपात केला जात असल्याची तक्रार बीड जिल्हा वैद्यकीय अधिक्षक यांच्याकडे प्राप्त झाली. त्यानंतर डमी महिला तयार करून फोनद्वारे याची पुष्टी केली. या प्रकरणी बीड स्थानिक गुन्हे शाखा व वैद्यकीय पथक यांनी छापा टाकला. याठिकाणी एक महिलेसह तरुणाला ताब्यात घेतले असून एकजन फरार झाला आहे. तसेच सोनाग्राफी मशीन व गर्भपातासाठी सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू असून या घटनेने खळबळ उडाली आहे. बीड जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक बडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या सुरेखा धस, विधी अधीक्षक मोहम्मद नोमानी, डॉ.रांदड, डॉ.राजेश शिंदे तसेच पी.टी. चव्हाण, गणेश हांगे, नारायण कोरडे, सुनील राठोड, मपोशि मनीषा राऊत, चंद्रभागा मुळे, ढाकणे, चाटे, रेखा गोरे यांचा सहभाग आहे.

Tagged