अंधारात जात असलेल्या ठाकरे गटाला रामराम!

बीड

विधानसभा जवळ आली की माझ्यावर अन्याय होतो – अनिल जगताप

बीड दि.5 : 1986 पासून शिवसेनेत काम केले, बाळासाहेबांचे विचार तळागाळात पोहचवले. शिवसेनेत जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी मिळाली. विधानसभा जवळ आली की माझ्यावर अन्याय केला जातो, पद काढले जाते. हे कशामुळे याचे उत्तर मिळाले नाही. कुणाचेही ऐकून हा अन्याय केला जातो. ही सेना अंधारात जात आहे. त्यांना आमचा राम राम आहे. 9 जानेवारीला शिंदे गटत प्रवेश करणार आहे. अशी भूमिका अनिल जगताप यांनी जाहीर केली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल जगताप यांना दोन महिन्यापूर्वी बीड जिल्हाप्रमुख पदावरून हटवत जिल्हा सहसंपर्क प्रमुख पदावर नियुक्ती देण्यात आली होती. या निवडीने जगताप समर्थकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत संताप व्यक्त केला होता. मात्र अनिल जगताप यांनी पक्षाने घेतलेल्या निर्णयाबाबत काहीही भूमिका स्पष्ट केली नव्हती. शुक्रवारी (दि.5) बीड येथे पत्रकार परिषद घेऊन जगताप यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी अनिल जगताप यांच्यासह, बीड पंचायत समितीचे माजी उप सभापती मकरंद उबाळे, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्याम पडुळे, सागर बहीर, संतोष जाधव, सुनील अनभुले, सुदर्शन धांडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी मिळणार?
यापूर्वीही अनिल जगताप यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्यांची मनधरणी केल्याने हा निर्णय जगताप यांना मागे घ्यावा लागला. मात्र आज पुन्हा तोच निर्णय घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. आता शिंदे गटात त्यांना कोणती जबाबदारी मिळणार? जिल्हाप्रमुखपदी निवड होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.