georai-mla-lakshman-pawar

निधी हडपला; भाजप आमदारांच्या ताब्यातील नगरपरिषदेतील भ्रष्टाचार

गेवराई न्यूज ऑफ द डे

गेवराई : कोल्हेर रोड ते म्हाडा कॉलनी-वादे यांच्या घरापर्यंत नाली बांधकाम करणे हे काम प्रत्यक्षात झालेले नसतानाही कागदोपत्री ते झाल्याचे दाखवून 19.32 लाख रुपयांची देयके गेवराई नगर परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी कंत्राटदारांनी संगनमत करून हडप केले आहेत. तर कोल्हेर रोड-म्हाडा कॉलनी ते ईरा शाळेपर्यंत हा रस्ता नगर पालिकेच्या हद्दीत नसतानाही तेथे नाली बांधकाम करून 17.98 लक्ष रुपये गेवराई नगर परिषदेने खर्च केले आहेत. हे काम कोणाच्या फायद्यासाठी? केल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बनावट आणि नियमबाह्यपणे हद्दीच्या बाहेरील केलेल्या कामावर खर्च झालेल्या निधीची सखोल चौकशी करून दोषीविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली आहे. या बाबतचे निवेदन त्यांनी तहसिलदार यांना दिले. नगर परिषदेतील वारंवार उघडकीस येणार्‍या भ्रष्टाचारामुळे भाजपा आमदारांच्या कार्यपध्दतीबाबत शहरवासियांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

गेवराई नगर परिषदेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्या बाब लेखा परिक्षण अहवालात लेखा परिक्षकांनी नमुद केल्याची बाब गेवराई शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने उघडकीस आणली आहे. याबाबत त्यांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप दोषी विरुध्द कारवाई झाली नाही. त्यानंतर पालिकेने सन 2018-19 च्या दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून रु.19,32,174 एवढी मोठी रक्कम कंत्राटदाराला कोल्हेर रोड ते म्हाडा कॉलनी-वादे यांच्या घरापर्यंत येथे नाली बांधकाम केल्याचे दाखवून अदा केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्रत्यक्षात काम न करता बनावट व खोटी कागदपत्रे तयार करून सर्वांच्या संगणमताने हा निधी लाटल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला आहे. त्याचबरोबर गेवराई नगर परिषदेने कोल्हेर रोड भागात मोठ्या प्रमाणावर हद्दीच्या बाहेर जावून निधी खर्च केला असून एकीकडे शहरातील रस्ते आणि नाल्या यांची दुर्दशा झालेली असताना कोल्हेर रोड भागात कोणाच्या फायद्यासाठी हा सार्वजनिक निधी खर्च केला जात आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. कोल्हेर रोड-म्हाडा कॉलनी ते ईरा शाळेपर्यंत हा रस्ता नगर परिषद हद्दीच्या बाहेर आहे, तरीही पालिकेने तेथे नाली बांधकामासाठी 17,98,872 रुपये कंत्राटदाराला दिलेले आहेत. केवळ बीले उचलण्यासाठी या जागेवर फोटो काढण्यापूरते फलक लावण्यात आले मात्र ही बोगस कामे असल्याने हे फलक तातडीने हटविण्यात आले. एकीकडे शहरात नागरीक नाली बांधकामाची मागणी करत असताना नेतृत्वाच्या सोयीसाठी नियमबाह्यपणे कामावर खर्च होत असल्यामुळे नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. नगर परिषदेच्या या भ्रष्टाचाराची चौकशी करुन दोषीविरुध्द कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीने केली आहे. या बाबतचे लेखी निवेदन त्यांनी तहसिलदार, गेवराई यांना दिले. यावेळी नगरसेवक राधेशाम येवले, शहराध्यक्ष दिपक आतकरे, तालुकाध्यक्ष, ऋषिकेश बेदरे, अक्षय पवार, दत्ता दाभाडे, जालिंदर पिसाळ, गोरख शिंदे, संदीप मडके, वसीम फारुकी, सय्यद आल्ताफ, शेख मन्सुर, महादेव बेदरे, रवि भुजंगे, फेरोज शेख आदी यावेळी उपस्थित होते.

Tagged