collector jagtap

आता वाळुघाटांवरही प्रवेशासाठी कोरोना चाचणी केली बंधनकारक

कोरोना अपडेट बीड

शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या तक्रारीनंतर प्रशासनाचे आदेश

बीड : माजलगाव, गेवराई तालुक्यातील शासकीय वाळूघाटांवर कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याची तक्रार शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी करत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत थेट वाळूघाट बंद ठेवण्याची मागणी मंगळवारी केली. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आता वाळुघाटांवरही प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक केली असून कोरोनाच्या निगेटिव्ह अहवालाशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येऊ नये असे आदेश बुधवारी दिले आहेत.

   गेवराई तालुक्यातील सुरळेगाव, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, नागझरी तर माजलगाव तालुक्यातील आडोळ, गव्हाणथडी येथील वाळूघाटांचे लिलाव झाले असून वाळू ठेकेदारांकडे ताबा दिला आहे. या वाळूघाटांवर ठेकेदारांकडून पर्यावरणासह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बे्रक द चेनअंतर्गत नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला होता. एकाच ठिकाणी 800 ते 1000 लोक जमा असतात, हेच लोक ग्रामीण भागासह शहरात कोरोना संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मुळूक यांनी म्हटले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आता मजूर, वाहतूकदार, वाहन चालक, ठेकेदार व त्यांचे नियुक्त कर्मचारी अशा सर्वांनीच कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच, कोरोना निगेटिव्ह अहवाल असणार्‍या व्यक्तींनाच वाळूघाटांवर प्रवेश असेल. कोरोना निगेटिव्ह अहवाल हा केवळ 7 दिवस ग्राह्य धरले जाईल. तसेच, वाळूघाटांवर मुबलक प्रमाणावर सॅनिटायजर उपलब्ध करून देण्यासह चाचणी करून घेण्याची जबाबदारी ठेकेदारांची असल्याचे आदेशात म्हटले आहे.

तपासणीसाठी तहसीलदारांचे पथक; कोरोना चाचणी नसल्यास थेट गुन्हा
वाळूघाटांवरील व्यक्तींनी कोरोना चाचणी केली का? त्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे का? या तपासणीसाठी तहसीलदारांनी पथक स्थापन करून तपासणी करण्याच्या सूचना आहेत. तपासणीदरम्यान कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नसताना प्रवेश केल्याचे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करा
वाळूघाटांवर कोरोना नियमांसह पर्यावरण कायद्यांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. त्याठिकाणी जे.सी.बी., पोकलेनसह अन्य यंत्रांच्या सहाय्याने वाळुचे मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या उत्खनन होत आहे. एका पावती वर 3 ब्रासची मान्यता असताना बेकायदेशीररित्या एक पावतीवर 5 ब्रास वाळुचा उपसा केला जातो. यातून शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. त्यामुळे दोषी ठेकेदारांविरूद्ध कारवाई करावी, कोरोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत वाळूघाट बंद ठेवावेत अशी आग्रही मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केली असून ते मागणीवर ठाम आहेत.

Tagged