mete accident truck

3 ऑगस्टच्या रात्रीही विनायक मेटे यांच्या गाडीचा आयशर टेम्पोने केला होता पाठलाग

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र राजकारण

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची ज्योतीताई मेटे यांची मागणी

बीड, दि.16 : शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक विनायक मेटे vinayak mete यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. 14 ऑगस्टच्या पहाटे त्यांच्या गाडीला आयशर या मालवाहु गाडीने धडक दिल्यानंतर त्यात त्याचं निधन झालं. मात्र 3 ऑगस्टच्या रात्री मेटे हे बीडकडून मुंबईला जात असताना शिक्रापूर जवळ एका आयशर टेम्पोने त्यांच्या गाडीला अनेकदा हुलकावणी दिली. सोबतच दुसरी एक फोरव्हीलर गाडी अनेकदा ओव्हरटेक करून मेटेंच्या गाडीला आयशर गाडीवर धडकवण्याचा प्रयत्न करीत होती अशी एक कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाली आहे. त्यामुळे मेटे यांच्यासोबत यापुर्वीच काही घातपात करण्याचा डाव होता का? असा संशय आता निर्माण झाला आहे.

विनायक मेटे यांचं मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाती निधन झालं. पण 3 ऑगस्ट रोजी शिक्रापूर इथं दोन गाड्यांनी पाठलाग केला होता, असा खुलासा मेटेंचे सहकारी अण्णासाहेब मायकर यांनी केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटेंनी चौकशीची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या, काही गोष्टी अनाकलनिय आहेत, त्या गोष्टींचे सत्य समोर आले पाहिजे. 3 तारखेला गाडीने पाठलाग केला होता. पोलिसांनी आता एक गाडी गुजरातमधून ताब्यात घेतली आहे. आता ती गाडी आणि अपघात झाल्यानंतर सापडलेली गाडी समान आहे का पाहावी लागेल’ असं ज्योती मेटे म्हणाल्या.
ज्या दिवशी विनायक मेटे यांचा अपघात झाला होता, त्यावेळी मला फोन आला होता. ती वेळ बघितली तर मृत्यू आधीच झाला होता. मला या गोष्टींचा उल्लेख झाला पाहिजे. गाडीचा ड्रायव्हर आहे तो सगळं सांगू शकतो किंवा पोलीस तपासातून समोर आलं पाहिजे. आमच्या कुटुंबीयांची हीच मागणी आहे, या प्रकरणातील सत्य समोर आले पाहिजे. मुख्यमंत्री शिंदे यांनी एक समिती नेमली आहे, पोलीस तपासातून खरं काय सत्य समोर आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

त्या कॉल रेकॉर्डींगमध्ये काय आहे?
बीडमधून मुंबईला निघालो होतो, 3 ऑगस्टच्या रात्री 11.30 वाजता शिक्रापूरजवळ पोहोचलो होतो. एक गाडी आमचा पाठलाग करत होती. समोर आयशर ट्रक होता. त्या गाडीतली माणसं आम्हाला हात करून गाडी थांबवण्यासाठी इशारा करत होते. पण, मेटे साहेबांनी गाडी थांबवण्यास नकार दिला, गाडी आयशर ट्रकच्या मागेच ठेवण्यास सांगितले होते. पुढे एक छोटे गाव आलं, तिथे या गाडीने आमच्या गाडीला जोरात कट मारला आणि निघून गेले. मग आम्ही आयशर ट्रकला मागे टाकून पुढे निघून गेलो, अशी माहिती मायकर यांनी दिली.जी गाडी आमचा पाठलाग करत होती, त्यामध्ये पाठीमागे एक जण बसलेला होता. तर पुढच्या सीटवर एक जण बसलेला होता. ड्रायव्हर मिळून अशी तीन माणसं त्या गाडीमध्ये होती, असंही मायकर यांनी सांगितलं. या घटनेनंतर आम्ही दुसर्‍या दिवशी मेटे यांच्या भाच्याला सांगितलं होतं. त्यांचा दुसरा ड्रायव्हर मोरे यांना सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकारामध्ये ड्रायव्हर समाधान मोरे आणि त्यांचा अंगरक्षक सुद्धा साक्षीदार होता, असंही मायकर यांनी सांगितलं.

Tagged