जमिनीच्या वादातून डोक्यात कुर्‍हाड घालून वृद्धाची हत्या!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी


परळी तालुक्यातील सिरसाळा येथील घटना
सिरसाळा
दि.9 : जमिनीच्या जुन्या वादातून एका 85 वर्षीय वृद्धाच्या डोक्यात कुर्‍हाडीने घाव घालत निघृण हत्या केली. ही घटना परळी तालुक्यातील सिरसाळा येथे बुधवारी (दि.8) रात्री घडली. या प्रकरणी मयताच्या मुलाच्या फिर्यादीवरुन सिरसाळा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिभाऊ नामदेव ढेंबरे (वय 85 रा.सिरसाळा ता.परळी) असे मयताचे नाव आहे. हरिभाऊ हे बुधवारी सायंकाळी शेतातील जनावरांना चारा टाकून घरी येत होते. यावेळी पोहनेर रोडवरील मेकॅनिक कॉलनी येथे त्यांच्या मानेवर कुर्‍हाडीचे घाव घालत त्यांच्यावर हल्ला केला. हरिभाऊ यांचा जागीच मृत्यू झाला. मयताचा मुलगा कैलास ढेंबरे याने सिरसाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन महादेव पोटे (रा.उमरी पारगाव) कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास प्रकाश शेळके हे करत आहेत.


मुलाचीही केली होती हत्या

सदरील जमीनीचा वाद हा अनेक वर्षापासून सुरु आहे. सात-आठ वर्षापूर्वी मयताचा मुलगा विलास ढेंबरे याचा महोदव पोटे यांनी खून केला होता. तसेच जमीन माझ्या नावे करा, नाहीतर तुमच्या घरात रक्ताचे पाट वाहील, याआधी मी केलेले आहे. मला त्या वाटेवर पुन्हा जावू देऊ नका. अशा धमक्या देत असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

Tagged