केजच्या ‛विकासा’साठी आता ‛परिवर्तन’ गरजेचे

केज न्यूज ऑफ द डे

हारून इनामदार : जनविकास परिवर्तन आघाडी ताकदीने निवडणूक रिंगणात

केज : वर्षानुवर्षे सत्ता असलेल्या काँग्रेसने शहराची वाट लावली आहे. विकास शोधून सुद्धा सापडणार नाही, अशी परिस्थिती आहे. शहराच्या ‛विकासा’साठी आता ‛परिवर्तन’ गरजेचे, त्यामुळे नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन जेष्ठ नेते हारून इनामदार यांनी ‛कार्यारंभ’शी बोलताना केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेली जनविकास परिवर्तन आघाडी ताकदीने निवडणूक रिंगणात उतरली असून प्रस्थापितांना धक्का देण्याच्या तयारीत आहे.

  हारून इनामदार यांनी म्हटले की, शहराचा विकास रखडला आहे. सत्ताधाऱ्यांनी विकासाच्या योजना राबविल्या नाहीत. गत निवडणुकांत जाहीरनाम्यात दिलेला एकही मुद्दा पूर्ण केलेला नाही. सत्ताधारी असलेले ‛कारभारी पुण्याला, दरबारी लातूरला’ अशी परिस्थिती सध्या आहे. नगरविकास मंत्रालयाने केज नगरपंचायतीची नगरपालिका करण्याबाबतच्या कार्यवाहीचे पत्र अनेकदा प्रशासनाला दिले, परंतू, ते दाबून ठेवण्यात आले असा आरोप करत नगरपंचायतवर प्रशासक आल्यामुळे ही बाब आम्हाला उशिरा समजू शकली असे म्हटले आहे. आता विकास हवा असेल तर नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी. सत्ता आमच्या हाती आल्यास नगरपालिका दर्जा आणू. भव्य -दिव्य इमारत उभारू. नागरी सुविधा देण्यासह प्रलंबित क्रीडांगण, व्यापरी संकुल, उद्यान उभारण्यात येतील.

दिग्गज नेत्यांची परिवर्तन आघाडीला साथ
केजबद्दल आस्था असणाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही लढत आहोत. आम्हाला दिग्गज नेत्याच्या अनेक समर्थकांची साथ लाभली आहे. त्यामुळे यावेळी सत्ता परिवर्तन करण्यात आम्हाला यश येईल, असा विश्वास हारून इनामदार यांनी व्यक्त केला आहे. केज नगरपंचायत भ्रष्टाचार मुक्त करण्याचा आणि स्वच्छ प्रशासन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

Tagged