मतदारसंघ केज तर पंचायत समिती बीड असल्यामुळे रखडला २० गावांचा विकास!

केज न्यूज ऑफ द डे बीड

केज, बीडच्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; ॲड.नारायण सिरसट यांचा आंदोलनाचा इशारा

बीड : वडगाव -कळसंबरसह (ता.बीड) परिसरातील २० गावांचा मतदारसंघ केज तर पंचायत समिती बीड असल्यामुळे रखडला विकास रखडला आहे. केज व बीड मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिक नागरीकांनी केला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड.नारायण कोंडीबा सिरसट यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

   निवेदनात पुढे म्हटले आहे की, येळंबघाट पंचायत समिती गणातील वडगाव -कळसंबर, येळंबघाट, निवडुंगवाडी, डोईफोडवाडी, सानपवाडी, कारेगव्हाण, भंडारवाडी, जयतळवाडी, सोनपेठवाडी, आनंदवाडी, तांदळ्याचीवाडी यासह २० गावे केज मतदारसंघात आहेत. या मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा ह्या आहेत. तर पंचायत समिती ही बीड असून या मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आहे. या दोन्ही लोकप्रतिनिधींकडे स्थानिक नागरिक कामे घेऊन जातात. त्यावेळी मुंदडा ह्या आपल्या गावांना बीड पंचायत समिती असल्याचे सांगतात, तर आमदार संदीप क्षीरसागर हे मतदारसंघ केज असल्याचे सांगत जबाबदारी झटकतात. लोकप्रतिनिधींच्या या दुर्लक्षामुळे या भागाचा विकास रखडला आहे. त्यामुळे येळंबघाट पंचायत समिती गणातील वडगाव -कळसंबरसह २० गावे केज अथवा बीड पंचायत समितीला संलग्न करावीत. व विकासाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड.नारायण कोंडीबा सिरसट यांनी केली आहे.

एकही बैठक नाही, योजना राबविण्यास अडथळे
येळंबघाट पंचायत समिती गणातील गावांचा मतदारसंघ केज व पंचायत समिती बीड असल्याने लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून प्रशासनाने एकही बैठक घेतलेली नाही. तसेच, शासनाच्या योजना राबविण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहेत. याकडे लक्ष देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व दोन्ही आमदारांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा २० गावच्या ग्रामस्थांनी दिला आहे.

Tagged