NSL Shugar limited

…हो पण, लोखंडे साहेब दलालांच्या टोळ्या चालवू नका…

न्यूज ऑफ द डे माजलगाव शेती

बालाजी मारगुडे । बीड
दि. 10 : दोन दिवसांपुर्वी एनएसएल शुगरच्या कर्मचार्‍याला पोलीसासमोर भाई गंगाभिषण थावरे यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला. भाई चूक की बरोबर हे आम्हाला इथे अजिबात सांगायचे नाही. परंतु कारखाना प्रशासन ज्या प्रमाणे दलालांच्या टोळ्या चालवतं ते पाहता, तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. गरीब बिचारा शेतकरी जेव्हा कारखान्यात जातो त्यावेळी त्याला कर्मचारी किंवा कारखाना प्रशासनाकडून काडीचंही सहकार्य केलं जात नाही. उलट त्याला दलालांचा मार्ग दाखवला जातो. कारखान्याचे एमडी गिरीष लोखंडे यांच्या आशीर्वादाशिवाय दलाल नियमीत कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाहीत. त्यामुळे कारखान्याच्या मालकांनीच यात लक्ष घालून दलालांचा वावर बंद करून लोखंडे यांचे देखील कान पिळायला हवेत.


डॉ.बजाज यांनी सुरु केलेला जय महेश कारखाना शेतकर्‍यांसाठी नव संजिवनी देणारा ठरला आहे. परंतु काही कारणाने हा कारखाना बजाज यांनी एनएसएल ग्रुपला विक्री केला. एनएसएल ग्रुपने या कारखान्यात महत्वाचे तांत्रिक बदल करून कारखान्याची गाळप क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवली. त्यामुळे हा कारखाना माजलगावच्या ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी वरदानच आहे. ज्यावेळी लोकनेते सुंदरराव सहकारी साखर कारखाना, छत्रपती सहकारी साखर कारखाना एकाधिकारशाही गाजवत होते त्यावेळी एनएसएल शुगरने त्यांची ही एकाधिकारशाही मोडित काढण्याचं काम केलं. मात्र माजलगाव सहकारी साखर कारखान्याचं एका बाबतीत इतर सर्वच साखर कारखान्यांनी अनुकरण करायला हवं ते म्हणजे नोंदीप्रमाणे ऊसतोडणी करणे, ऊसतोडणी करण्यासाठी मजूर, ठेकेदार, मुकादमांना एक रुपयाही न देणे… या कारखान्याचे बील मागेपुढे होतही असतील परंतु आजतागायत या कारखान्याने कुणाच्या नोंदी मागेपुढे करून राजकीय हस्तक्षेपाने ऊस गाळपासाठी नेला हे ऐकीवात नाही. आमची नोंद घ्या असे सांगायलाही तिथे कुणी शेतकरी जात नाही. इतकी त्यांनी नोंदीच्या बाबतीत शिस्त आणली आहे. टोळी टाकण्याच्या बाबतीत तर कुठल्याच ऊस उत्पादकांची याबद्दल काहीच तक्रार नाही. मात्र एनएसएल शुगरने काही पाळीव दलाल ठेवले आहेत. हे दलाल वर्षानुवर्षे शेतकर्‍यांना लुबाडण्याचं काम करतात. दहा-पाच हजारात कुठल्याही शेतकर्‍यांच्या नोंदी घुसडतात. नोंदीप्रमाणे टोळ्या न टाकता दहा-पाच हजार रुपये घेऊन कुणाचाही ऊस गाळपासाठी नेला जातो. ज्या टोळ्या ऊस तोडायला येतात त्याचा टोळी मुकादम देखील शेतकर्‍यांना सारखा लुटत राहतो. मजूर देखील तेच करतात. फक्त गरीब बिचारा शेतकरी आपला ऊस जातोय यातच समाधान मानून घेतो. ही सगळी चूक, होणारी लूट एनएसएल शुगरचे एमडी गिरीष लोखंडे यांना माहिती नाही काय? किंबहूना त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय कुठलाही दलाल या कारखान्यात हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे कर्मचार्‍यांना होणारी मारहाण, कारखान्यावर वेळोवेळी होणारे आंदोलन या सगळ्यांना एमडी गिरीष लोखंडे हेच जबाबदार असल्याचे दिसत आहे. शिस्त आणि त्यांचा काही संबंध आहे की नाही असा प्रश्न सारखा पडतो.
एनएसएल शुगर बद्दल परिसरातील सर्वच ऊस उत्पादक शेतकर्‍यांना प्रचंड आत्मीयता आहे. प्रेम आहे. हा कारखाना चालायला हवा ही प्रत्येकाची प्रामाणिक भावना आहे. पण भावनेला नख लावण्याचं काम कोण करतं? याचं आत्मपरिक्षण गिरीष लोखंडे हे करतील का?
आज गिरीष लोखंडे यांना पाठींबा द्यायला अनेकजण गेले. प्रत्येकाला भाई थावरे चुकीचं वागले असेच वाटले. भाई चुकीचे वागले म्हणून लोकांनी त्यांना त्यांची चुकी दाखवली. परंतु गिरीष लोखंडे मागील अनेक वर्षांपासून कारखान्यात दलाल पोसण्याचं काम करतात या चुकीबद्दल त्यांना काय शिक्षा असायला हवी?

एनएसएल शुगर महाराष्ट्रात नंबर एकवर राहील
एनएसएल शुगर तांत्रिक बाजुमध्ये अतिशय भक्कम आहे. कारखान्याने स्वतःच्या व्यवस्थापनात सुधारणा करीत कारखाना दलालमुक्त केला तर निश्चितपणे कारखाना महाराष्ट्रात नंबर एकवर आल्याशिवाय राहणार नाही. परंतु दलाल पोसण्यासाठी एमडी गिरीष लोखंडे असेच वागत राहीले तर त्यांच्यावर देखील शेतकर्‍यांचा संताप निघू शकतो. अशावेळी चापट-चुपट नाही तर ऊसाचा देखील वापर होऊ शकतो याची जाणीव लोखंडे साहेबांना असावी. शेतकरी शांत आहे तोपर्यंत सगळं सहन करेल. पण दलालांचा अतिरेक वाढला तर मात्र अशा घटना झेलायची देखील लोखंडे यांनी तयारी ठेवायला हवी.

दलाल कोण लोखंडेंना माहिती नसतील तर आम्ही सांगू
एमडी गिरीष लोखंडे यांना कारखान्यात कोण दलाली करतं हे माहिती नाही असं आंधळं सोंग आणलं तर आम्ही निश्चितपणे या मोठमोठ्या दलालांची नावे छापायला देखील मागेपुढे पाहणार नाही. त्यामुळे लोखंडे यांनी आडनावाप्रमाणे ‘लोखंड’ बनून न राहता आपल्या कंपनीसाठी ‘सोनं’ व्हावं, हीच कंपनीची देखील अपेक्षा असेल.

Tagged