थेरला, हनुमानवाडी, लिंबारूई, काकडहिरा, चुंबळी येथील मराठी वाचता न येणारी पोरं देखील चांगल्या मार्कांनी पास झाली
बालाजी मारगुडे । बीड
दि. 11 : आरोग्य सेवा गट ‘ड’ आणि गट ‘क’चा पेपर फुटल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली आहे. या पेपर फुटी प्रकरणात बीडचे रॅकेट असल्याचे आतापर्यंतच्या तपासात स्पष्ट झाले. मात्र खरा तपास तर आता इथून पुढे सुरु झालेला आहे. त्यात आता विविध परिक्षेत पास होण्याचा ‘वडझरी पॅटर्न’ चर्चेत आलेला असून सगळीच पोलखोल होणार आहे. वडझरी गावचे आणि परिसरातील थोडे थोडके नव्हे तर जवळपास 25 ते 30 जण गेल्या दोन वर्षात आरोग्य सेवेेत भरती झालेले आहेत. जो पेपर फुटीचा प्रकार घडला त्यातील मुख्य आरोपी भूम येथील ग्रामीण रुग्णालयाचा सहायक अधीक्षक राजेंद्र पांडूरंग सानप हा मूळ वडझरी (ता.पाटोदा) या गावचा आहे.
राजेंद्र सानप, किंवा प्रशांत बडगिरे नावाचे जे आरोपी पुणे सायबर पोलीसांनी पकडले ते अत्यंत छोटे आरोपी आहेत. यापुर्वी अशा अनेक परिक्षेतील पेपर फोडणारा मुख्य सुत्रधार अजुनही बीडमध्येच दडून बसलेला आहे. पोलीसांनी हा आरोपी इथून उचलल्यास अनेक परीक्षेतील पेपरफुटी बाहेर येणार आहे. राजेंद्र पांडूरंग सानप हा ज्या वडझरी गावचा रहीवाशी आहे त्या गावात आणि एकूणच गावच्या परिसरातील थेरला, हनुमानवाडी, लिंबारूई, काकडहिरा, चुंबळी येथील एक दोन नव्हे तर 25 ते 30 जण केवळ दोन वर्षात आरोग्य विभागात विविध पदावर नोकरीला लागलेले आहेत. या प्रत्येक उमेदवारांची चौकशी केली तर हा गैरप्रकार आणखी कुठल्या कुठल्या परिक्षेत झाला हे स्पष्ट होईल. आरोपी राजेंद्र सानप हा या प्रकरणातील खूप छोटा मासा आहे. बीडमधीलच आरोग्य विभागात काम करणारा एक साधा कर्मचारी महाराष्ट्र आणि बाहेर राज्यातील परिक्षांचे देखील पेपर फोडण्याचे काम करत होता, अशी माहिती आता पुढे येत आहे. आणि तोच व्यक्ती या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. मागील काही वर्षात या मुख्य सुत्राधाराने जिल्हाभरातून 200 च्या आसपास मुलांना आरोग्य सेवेमध्ये भरती केले आहे. पेपर फोडणे आणि त्या माध्यमातून पैसे गोळा करणे हे एकमेव काम हा व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून करीत असल्याची चर्चा संपूर्ण आरोग्य विभागात आहे. त्यामुळे पुणे सायबर पोलीसांनी या व्यक्तीवर लक्ष केंद्रीत केले तर महाराष्ट्रातील विविध परिक्षांमधील पेपरफुटी आणि पैसे देऊन झालेली भरती उघडकीस येणार आहे.
ऑनलाईन परिक्षाही करतो मॅनेज
कुठल्याही विभागाची ऑनलाईन परिक्षा असेल तर हा व्यक्ती या परिक्षाही मॅनेज करतो. संबंधीत उमेदवाराने सीसीटीव्हीत दिसण्यासाठी केवळ कॉम्प्यूटरवर बसून की बोर्डवर बोटं चालवायची तिकडून या व्यक्तीने ते कॉम्प्यूटर हॅक करून पेपर सोडवायचा, अशी पध्दत गेल्या अनेक वर्षांपासून राबवली जात आहे. यातून या व्यक्तीने वडझरी या भागातील अनेकांना पास करून कोट्यावधी रुपयांची माया जमवलेली आहे. पुणे सायबर पोलीसांनी ह्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या तर आतापर्यंतच्या सगळ्या परीक्षांचा घोटाळा बाहेर येणार आहे.
12 ते 14 लाख रुपयांचा रेट
ज्या मुलांना साधं मराठी देखील धड वाचता येत नाही, त्या मुलांनी अनेक परीक्षांमध्ये 130 ते 180 मार्कांपर्यंत मजल मारलेली आहे. एका एका वस्तीवरील 5 ते 10 मुलं चांगल्या मार्कांनी पास झालेली आहेत. या मुलांना पेपर फोडून पास करण्यासाठी या व्यक्तीने 12 ते 14 लाख रुपये प्रत्येक व्यक्तींकडून उकळलेले आहेत. अशीच एक एमपीडब्ल्यूची परिक्षा देखील मागील तीन चार महिन्यांपासून वादात अडकलेली आहे.
बीडचे दोन विद्यार्थी अटकेत
नामदेव विक्रम करांडे (वय 33 रो हाऊस नं.3, अष्ट विनायक कॉलनी कॅनॉल रोड गयानगर बीड), उमेश वसंत मोहिते (वय 24 रा.कोताळ ता.उमरगा) या दोघांनी मुख्य प्रशासकीय अधिकारी सार्वजनिक आरोग्य विभाग लातुरचा प्रशांत बडगीरे यास करांडे याने 8 लाख तर मोहिते याने 5 लाख ठरवून 2 लाख दिल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या दोघाही विद्यार्थ्यांना अटक करण्यात आलेली आहे. या दोघांनी इतर कोणाला पेपर दिला का याचा तपास पुणे सायबर पोलीस करीत आहेत. अटकेची कारवाई पोलीस उपनिरीक्षक डफळ, पोलीस अंमलदार अनिल पुंडलिक, अश्विन कुमकर, चालक सुनील सोनोने यांनी केली.
खर्या परिक्षार्थींना न्याय मिळेल
या प्रकरणाचा तपास पुणे सायबर विभागाकडे आहे. या विभागाच्या प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके आहेत. पेपर फुटीचा संपूर्ण तपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु आहे. नवटके या न्यायप्रिय आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. आतापर्यंत अनेक मोठे आर्थिक गुन्हे त्यांनी उघडकीस आणून बड्या बड्या आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातही त्या संपूर्ण पाळेमुळे खणून काढतील असा विश्वास प्रामाणिकपणे अभ्यास करणार्या उमेदवारांना आहे.
महिनाभरापुर्वीच प्रश्नपत्रिकेला फुटले पाय
आरोग्य विभागाच्या गट ‘क’ व ‘ड’ ची परीक्षा 24 सप्टेंबरला होणार होती. मात्र प्रवेशपत्रिका, परीक्षा केंद्र व तांत्रिक गोंधळामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 23 सप्टेंबर रोजी परीक्षा पुढे ढकलल्याचे घोषीत केले. त्यानुसार, 24 ऑक्टोबरला गट ‘क’ची तर 31 ऑक्टोबरला गट ‘ड’ची परीक्षा झाली. उमेदवारांनी तक्रारी केल्यानंतर सायबर पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली. या प्रकरणामध्ये बोटले, बडगिरे यांनाही अटक झाली. त्यातुनच गट ‘ड’ पाठोपाठ गट क’चीही प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती पुढे आली. विशेषतः बोटले याने दोन्ही प्रश्नपत्रिका फोडण्याचा प्रकार परीक्षेच्या दिवशी नव्हे, तर तब्बल एक महिना आगोदरच केल्याची माहिती आता पुढे आली आहे. या माध्यमातून प्रशांत बडगिरे 20 जणांना पेपर देऊन 1 कोटी रुपये कमावणार होता.
आतापर्यंत 14 जण अटकेत
विजय प्रल्हाद मुर्हाडे (वय 29 रा.नांदी ता.अंबड), अनिल दगडू गायकवाड (वय 31 रा.किनगाव वाडी ता.अंबड), बबन बाजीराव मुंढे (वय 48 रा. पळसखेडा झाल्टा ता.देऊळगाव राजा), सुरेश रमेश जगताप (रा.बोल्हेगाव ता.घनसावंगी), संदीप शामराव भुतेकर (वय 38 रा.भाग्योदय नगर सातारा परिसर औरंगाबाद), प्रकाश दिगंबर मिसाळ (वय 40 रा. कामधेनू पार्क, वराळे ता.मावळ, व्यवसाय नेव्हल डॉकयार्डमध्ये खलाशी), उध्दव प्रल्हाद नागरगोजे (वय 36 रा. तिंतरवणी. ता.शिरूर व्यवसाय जिल्हा परिषद शिक्षक बीड), मुख्य प्रशासकीय अधिकारी आरोग्य विभाग लातुरचा प्रशांत व्यंकट बडगीरे (वय 50 रा. योगेश्वरी नगरी अंबाजोगाई), मेंटल हॉस्पिटल अंबाजोगाईचा वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड (रा.एकात्मता कॉलनी यशवंतराव चौक अंबाजोगाई), नेकनूर स्त्री रुग्णालयाचा शाम महादू मस्के (रा.पंचशील नगर अंबाजोगाई), भूम येथील ग्रामीण रुग्णालयाचा सहायक अधीक्षक राजेंद्र पांडुरंग सानप (रा.भक्ती कंस्ट्रक्शन शामनगर बीड, मुळ गाव वडझरी ता.पाटोदा), राष्ट्रीय आरोग्य अभियानचा सहसंचालक महेश सत्यवान बोटले, नामदेव विक्रम करांडे (वय 33 रो हाऊस नं.3, अष्ट विनायक कॉलनी कॅनॉल रोड गयानगर बीड), उमेश वसंत मोहिते (वय 24 रा.कोताळ ता.उमरगा)