khun, balatkar, murder, rape

कोठेवाडीच्या दरोडा, बलात्कार प्रकरणातील आरोपीची मोक्कातून सुटका

न्यूज ऑफ द डे मराठवाडा

आष्टी : पाथर्डी तालुक्यातील कोठेवाडीच्या दरोडा आणि बलात्कार प्रकरणाने 2001 साली संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेले होते. या प्रकरणातील बारा आरोपींची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातून (मोक्का) सुटका करण्यात येत असल्याचे औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे. त्यांनी भरलेल्या दंडाची रक्कम परत करावी तसेच त्यांच्या अन्य गुन्ह्यातील शिक्षा प्रलंबित नसतील तर त्यांना तुरुंगातून सोडण्यात यावे, असा आदेशही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे हे आरोपी आता तुरूंगातून बाहेर येणार असल्याने पोलीसांसमोरील डोकेदुखी वाढणार आहे.

नगरच्या जिल्हा न्यायालयाने या आरोपींना जन्मठेप सुनावली होती. ही शिक्षा उच्च न्यायालयात कायम झाली होती. मधल्या काळात आरोपींविरूद्ध मोक्का लावण्यात आला होता. पाथर्डी, गंगापूर व वैजापूर तालुक्यांमध्ये दरोडा, मारहाण, बलात्कार, सामूहिक बलात्कार असे गुन्हे असल्याने औरंगाबादच्या विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. मोक्का न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी डिसेंबर 2016 मध्ये या गुन्ह्यातील 13 आरोपींना 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 10 लाखांचा, तर एकूण 1 कोटी 30 लाखांचा दंड ठोठावला होता. या विरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात आपील केले होते. 3 ऑगस्ट 2021 रोजी न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी निकाल दिला. या आरोपींविरुद्ध लावण्यात आलेली मोक्का कायद्यातील कलमे लागू पडत नाहीत. आरोपींनी अनेक गुन्हे केले असल्याचे सरकार पक्षाचे म्हणणे असेल तरी कायद्याच्या व्याख्येनुसार ते संघटित गुन्हे असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही, त्यामुळे आरोपींची सुटका करण्यात येत असल्याचे निकालपत्रात म्हटले आहे.

सर्व आरोपी बीड जिल्ह्यातील
टोळी प्रमुख दारासिंग उर्फ मारुती वकिल्या भोसले (28, रा. धामणगाव, ता. आष्टी, जि. बीड), रमेश उर्फ रेच्या धुपाजी काळे (32, रा. ब्राह्मणगाव, ता. आष्टी), बंडू उर्फ बबन उत्तम भोसले (30, रा. वाळूंज, ता. जि. नगर), हबीब उर्फ हब्या पानमळ्या भोसले (30, रा. साबलखेड), गारमन्या खुबजत चव्हाण (37, रा. शेरी, ता. आष्टी), राजू उर्फ अंदाज वकिल्या भोसले (25, रा. धामणगाव), उमर्‍या धनश्या भोसले (37, रा. चिखली, ता. आष्टी), रसाळ्या डिंग्या भोसले (30, रा. चिखली), संतोष उर्फ हरी डिस्चार्ज काळे (25, रा. हिवरे पिंपळखेड, ता. आष्टी), सुरेश उर्फ तिर्थ्या चिंतामण काळे (21, रा. शेरी, ता. आष्टी), हनुमंता नकाशा भोसले (25, रा. हिवरे पिंपळखेड, ता. आष्टी), चिकू उर्फ चिक्या सरमाळ्या भोसले (35, रा. वाळूंज, ता. आष्टी).

अशी घडली होती घटना…
17 जानेवारी 2001 रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता कोठेवाडी (ता. पाथर्डी, जि. नगर) येथे संपूर्ण वस्तीवर 10 ते 15 आरोपींनी दरोडा घालून जबर मारहाण करीत चार महिलांवर सामूहिक बलात्कार केला होता. 44 हजार 35 रुपयांचे दागिने लुटले होते. तेव्हा ही घटना राज्यात गाजली होती. अहमदनगर पोलिसांनी आरोपींना अटक केली. नगरच्या तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश ज्योती फणसाळकर-जोशी यांनी आरोपींना जन्मठेप सुनावली होती. सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.

आरोपींनी अनेक तालुक्यात केले होते गुन्हे
या सर्व आरोपींनी 10 वर्षांच्या कालावधीत संघटितपणे तसेच वैयक्तिकरित्या कोठेवाडीसह पाथर्डी, गंगापूर, वैजापूर तालुक्यांमध्येही दरोडे, बलात्कार, सामूहिक बलात्काराचे गुन्हे केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आरोपींवर ‘मोक्का’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यावर औरंगाबादच्या विशेष मोक्का न्यायालयात सुनावणी झाली. कोर्टाने मोक्का कायद्याच्या कलम 3 (1) (2) अन्वये सर्व 13 आरोपींना 12 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 लाख रुपये दंड व दंड न भरल्यास आणखी 2 वर्षे सक्तमजुरी, तर मोक्का कायद्याच्या कलम 3 (4) अन्वये सर्व आरोपींना 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 5 लाख रुपये दंड व दंड न भरल्यास 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. ती आता उच्च न्यायालयाने रद्द ठरविली आहे. यातील काही आरोपींची पूर्वीची शिक्षा भोगून झालेली आहे. त्यामुळे हे आरोपी आता तुरूंगाबाहेर येण्याची शक्यता आहे.