school Palwan

17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या हालचाली

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे महाराष्ट्र

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती ः 5 वी ते 8 वर्गाला मिळणार परवानगी
मुंबई, दि. 6 : कोरोना काळात राज्यातील शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय अवलंबावा लागला आहे. त्याच अनुषंगाने देशातील सर्वच बोर्डांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, एकीकडे कोरोनाचं प्रमाण काहीसं नियंत्रणात येत असल्याचं दिसत असल्यामुळे राज्यात शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय येत्या आठवड्याभरात होण्याची शक्यता आहे. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तशी माहिती दिली आहे.

त्या म्हणाल्या, 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्यासंदर्भात कमिटीने सर्व एसओपी निश्चित केल्यानंतर त्याची माहिती दिली जाईल. आत्तापर्यंत कोरोना रुग्णसंख्या मर्यादित असलेल्या ग्रामीण भागातच शाळा सुरू असताना आता शहरी भागातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यात सध्या कोरोनासंदर्भातले निर्बंध लागू आहेत. कोरोनाच्या स्थानिक परिस्थितीनुसार निर्बंध देखील काही ठिकाणी शिथिल तर काही ठिकाणी कठोर अशा स्वरूपाचे आहेत. रुग्णसंख्या कमी झालेल्या राज्याच्या ग्रामीण भागात आधीच शाळा सुरू करण्याची मुभा राज्य सरकारने दिली असून त्यासाठी रुग्णसंख्या आणि इतर अटी घालून दिल्या आहेत. आता त्यामध्ये अधिकच्या वर्गांचा समावेश देखील केला जाणार आहे.

काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
येत्या 17 ऑगस्टपासून राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत. रुग्णसंख्या कमी झाली आहे, अशा ठिकाणी ग्रामीण भागात 5 वी ते 8वीच्या शाळा देखील सुरू करण्याचा विचार आहे. त्यासोबतच शहरी भागात महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या समितीप्रमाणेच शहरी भागांसाठीही समितीची नियुक्ती करण्यात येईल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. सध्या राज्यात ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे, त्या ग्रामीण भागात 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू करण्याची मुभा देण्यात आली आहे. आता त्यामध्ये शहरी भागाचा देखील समावेश करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

बीड जिल्ह्यातील 40 शाळा बंद
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता कोरोनामुक्त गावामध्ये ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समितींच्या ठरावाने सुरू असलेल्या चाळीस शाळा बंद करण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. ग्रामीण भागामध्ये रुग्ण वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित सुरू असलेल्या 80 शाळांमध्ये अत्यल्प उपस्थिती असून तिसर्‍या लाटेच्या भीतीमुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. शुक्रवारी (दि.6) बीड जिल्ह्यात 212 रुग्ण आढळून आले आहेत.

Tagged