vinayak mete new bangala

आईसाठी बांधलेल्या घरात गृहप्रवेश करण्यापुर्वीच बप्पा गेले…

केज न्यूज ऑफ द डे बीड महाराष्ट्र राजकारण

अमोल जाधव । नांदूरघाट
दि.14 : अतिशय साध्या कुटुंबातून पुढे आलेले विनायकराव मेटे vinayak mete हे केज तालुक्यातील राजेगावचे. या ठिकाणी त्यांची आई आजही वास्तव्य करून राहते. आजपर्यंत आई एका छोट्याश्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती. मात्र मेटे यांनी त्यांच्यासाठी एक छानसं घर बांधलं होतं. काल (13 ऑगस्ट) ते गावाकडे जाऊन घराची पाहणी करून आले. छोट्याश्या पत्र्याच्या शेडमध्ये त्यांनी आईच्या हातची भाकरी देखील खाल्ली आणि 22 तारखेला गृह प्रवेशाचा मुहूर्त देखील त्यांनी ठरवून टाकला. यावेळी मला यायला जमले नाही तर तूच गृहप्रवेश उरकून घे असे त्यांनी आईला सांगत तेथून येतो म्हणून निरोप घेतला मात्र गावचे बप्पा आता कधीच परत न येण्यासाठी असे निघून जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. आज जेव्हा त्यांच्या निधनाची वार्ता कळाली तेव्हा अख्खं गाव धायमोकलून रडत होते. सकाळी सात वाजताच गावाकडे या अपघातात बप्पा गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अख्खं गाव शोक सागरात बुडाले. दिवसभरात गावात एकही चूल पेटली नाही.

विनायक मेटे यांच्या आई राहत असलेले हेच ते राजेगावमधील जुने घर.



ग्रामस्था सांगत होते, कालच बप्पा गावात आले होते. घराच्या बांधकामाची त्यांनी पाहणी करून 22 ऑगस्ट रोजी वास्तुशांतीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले. या ठिकाणी दीड तास ते आईसोबत व ग्रामस्थांशी बोलत होते. त्याचवेळी त्यांना मुंबईवरून फोन आला. मराठा आरक्षणासंदर्भात बैठक आहे तुम्ही मुंबईला पोहोचा असा तिकडून निरोप होता. त्याचवेळी आईच्या मनात दचकी भरली. म्हणाली “अरे बप्पा वास्तुशांती आहे. एवढे मोठे मला घर बांधले. कार्यक्रम आहे थोडी धावपळ कमी कर, दोन घास खा”, यावर विनायकराव मेटे म्हणाले आई “तुम्ही जसे कुटुंब आहे तसा समाज माझे कुटुंब आहे. लेकरं बाळं शिकण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे. त्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आहे मला जावे लागेल. मी काही त्या दिवशी कामात असले तरी 22 तारखेला वास्तुशांती पूजा करून घ्या”, असे सांगितले. त्यानंतर त्यांनी आईच्या आग्रहाखातर पत्र्याच्या शेडमध्ये बसून भाकरी देखील खाल्ली.



पण आजचा दुःखद दिवस उजाडला आणि गावाला शोकसागरात बुडवून गेला. गावातील आबालवृध्दांना तर या वृत्ताने प्रचंड धक्का बसला. जो तो धायमोकलून रडत होता. महाराष्ट्राला लाभलेला रत्न राजेगावमधला तो आम्हाला कायमचा सोडून गेला. ज्या गावाची ओळख जिल्ह्यात किंवा परिसराला लवकर माहिती नव्हती त्या राजेगावचे नाव राज्यात नेण्याचे काम सामान्य कुटुंबातील व्यक्तीने केले. यामुळे राजेगाव मधील प्रत्येक व्यक्ती शोक सागरात होता. काल बप्पाला बोललो अन् आज ते आपल्यात नाहीत याच्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. दिवसभर लहान थोर व्यक्ती दारात बसून बाप्पाच्या विचारात व आठवणीत सुन्न दिसून आले. अख्ख्या गावात काल एकही चूल पेटली नाही. नांदूरघाट व परिसरात पहाटे साडेसहाच्या दरम्यान लोकांना माहिती याची माहिती झाली. प्रत्येक जण व्याकुळ झाला. नांदुरघाटसह 15 खेड्यामध्ये एकही दुकान किंवा मार्केट उघडले नाही. प्रत्येक गावात प्रत्येक चौकात स्वर्गीय विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

विनायक मेटे यांच्या आईसाठी त्यांनी बांधलेले राजेगावमधील हेच ते नवे घर, याच घराचा 22 ऑगस्ट रोजी गृहप्रवेश होता.
Tagged