गोल्ड मेडलिस्ट प्रा.दिनेश माने यांचे दुःखद निधन

क्राईम गेवराई न्यूज ऑफ द डे बीड

बागपिंपळगाव परिसरातील पुलाखालील आढळला होता मृतदेह
 गेवराई दि.3 :  गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव येथील पुलाखाली 55 वर्षीय अज्ञात इसमाचा 2 मे रोजी मृतदेह आढळून आला. सदरील मृतदेहाची ओळख पटवण्याचे पोलीसांकडून अवाहन करण्यात आले. काही तासातच या मृतदेहाची ओळख पटली. तो मृतदेह एम.ए.मराठी विषयाचे गोल्ड मेडलिस्ट प्रा.दिनेश माने यांचा असल्याचे निष्पन्न झाले. नाट्यकलावंत, गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक असलेले दिनेश माने यांची अशा पद्धतीने एक्झिट होईल अशी कोणालाही कल्पना नव्हती. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, 2 मे रोजी गेवराई शहरापासून पश्चिमेस असलेल्या बाग पिंपळगावच्या पुलाखाली 55 वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. परंतु त्याची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी फोटोसह प्रेस नोट काढून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन केले. सदर प्रेसनोट पत्रकार दिनकर शिंदे यांच्याकडे येताच, त्यांनी फोटो पाहून फोटोतील व्यक्ती हे एम.ए मराठी विषयाचे गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक दिनेश माने असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले. प्रा.दिनेश माने हे गेवराई तालुक्यातील उत्कृष्ट, हरहुन्नरी नाट्यकलावंत, दिग्दर्शक, रोखठोक लिखाण करणारे साहित्यिक होते. ते काही वर्ष पाटोदा येथे जय भवानी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांचे नातेवाईक गेवराई येथे असून त्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांक पत्रकार दिनकर शिंदे यांनी पोलिसांना कळवले. सपोनि.प्रफुल्ल साबळे यांनी त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन ओळख पटवली. तपासात सहकार्य केल्याबद्दल पत्रकार दिनकर शिंदे यांचे पोलिसांनी आभार मानले. एक नाट्यकलावंत, गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक असलेले दिनेश माने यांची अशा पद्धतीने एक्झिट होईल. अशी कोणालाही कल्पना नव्हती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गेवराई शहरात कलावंतांनी व नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. स्वाभिमानी असलेले प्राध्यापक दिनेश माने यांनी नोकरी गेल्यानंतर निर्माण झालेल्या हालाखीच्या परिस्थितीत अनेक कष्टाची कामे करून आपला उदरनिर्वाह भागवला. कार्यतत्पर असलेल्या दिनेश माने यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे मात्र समजू शकले नाही.

Tagged