बालाजी मारगुडे । बीड
दि. 23 : आतापर्यंत माणसं माणसांना फसवत होती पण आता बीड जिल्ह्यात देवांना फसवणारी माणसांची नवी टोळी देखील उदयास आली आहे. या टोळीत एमपीएससी पास होऊन आई-बापाचं नाव काढणार्या अवलादी आहेत, 10 वी पास मंडळाधिकारी, तलाठी बनून ‘जे नसे ललाटी ते करी तलाठी’ अशा म्हणीला साजेसं वागणार्या भ्रष्ट पैदाशी आहेत, 4 थी पास शिपाई तर आहेतच पण ‘पांढर्या’ कपड्यात वावरून आपण समाजाचे खूप मोठे तारणहार आहोत असं सांगणारी पृथ्वी तलावरील सर्वात मोठी स्वार्थी जमात आहे. या सगळ्यांनी मिळून बीडमधील सर्वधर्मीय देव-देवतांची फसवणूक केली आहे. सरकारी रेकॉर्डवर जरी अद्याप या फसवणुकीची नोंद झालेली नसली तरी त्या विधात्याकडं या सगळ्या नोंदी अद्यावत आहेत हेच ही टोळी विसरलेली आहे.
मुद्देसूद
बीड जिल्ह्यात विविध जाती-धर्माच्या देवस्थानांच्या दिवाबत्तीचा खर्च भागविण्यासाठी तत्कालीन निजाम राजवटीने काही जमीनी दिलेल्या होत्या. या जमीनीत निघणार्या उत्पन्नातून त्याकाळी देवस्थानांचा खर्च भागवला जायचा. ही जमीन थोडी थोडकी नाही तर तब्बल 27 हजार एकर तिची अधिकृत नोंद घेण्यात आलेली आहे. नोंदच न घेतलेली कितीतरी एकर जमीनी आपल्या आधीच्या पिढीनं गिळंकृत केल्या. जमीनी गिळंकृत करणारे कुठल्याही एका जातीधर्माचे, पक्षाचे नाहीत. सगळ्याच राजकीय पक्षात या बांडगुळांना मानाचं स्थान आहे. पण यातील कोणाचंही नाव थेट रेकॉर्डवर नाही. पाळलेल्या अनेक बगलबच्च्यांना त्यांनी लुच्चेपणासाठी वापरले आहे. ज्यांना गल्लीत ‘काळं कुत्रं’ सुध्दा ओळखत नाही त्या लोकांच्या नावे अधिकारी, कर्मचार्यांनी शेकडो एकर प्लॉटींगच्या जमीनी करून दिल्या आहेत. आजमितीला या जमीनीची किंमत एकरी कोट्यावधी रुपये आहे. ‘कार्यारंभ’ला मिळालेल्या प्राथमिक माहितीत ही 1147 एकर जमीन आहे. मात्र अजुनही एक हजार एकर जमीनीचे असेच कागदपत्रं बनवून तलाठी आणि मंडळाधिकारी योग्य संधीची वाट पहात आहेत.

हा सगळा प्रकार या टोळीने मार्च 2021 ते मे 2021 या दोन महिन्याच्या कार्यकाळात केलेला आहे. कागदपत्रांवर भलेही 2018 चे साल टाकण्यात आलेले असेल पण हे ‘पाप’ लॉकडाऊनमध्ये झालेले आहे. म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून घरात बसून होतो त्यावेळी या टोळ्या ऑफिसला बाहेरून कड्या कुलूपं घालून आतमध्ये कागदं ‘काळी-पांढरी’ करीत होती. रात्री घरी जाताना आपल्याला दररोज न चुकता एक अवाहन करीत होती. ‘घरात बसा आणि प्रशासनाचे नियम पाळा’, ‘सतत हात धुवा, सॅनिटाईज करा, लक्षणं दिसली तर ताबडतोब टेस्ट करून घ्या’. त्यांनी सांगितलेले नियम आपण पाळत गेलो पण तरीही कोरोना वाढतच होता. कारण देवस्थानच्या जमीनी लुबाडण्याचा ‘विषाणू’ ह्यांच्या डोक्यात शिरलाय हे आपल्या कुणाच्याच लक्षात आले नव्हते.
आपले आप्त स्वकीय ऑक्सिजन बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी जिवाचा आकांत करीत होती. तेव्हा पांढर्या कपड्यातील स्वार्थी जमात स्वतःचे फोन बंद करून काय उद्योग करीत होते हे आता सगळ्यांना समजले असेल. माणसं मेली काय आणि जगली काय? त्याचं यांना देणंघेणंच नव्हतं. जिथे देवांना फसवायचा यांचा उद्योग तिथे माणसं वाचवायची अपेक्षा करणे देखील दुर्दैवीच!
निजाम किती वाईट होते ह्याच कथा आजही आम्हाला सांगितल्या जातात. खर्या खोट्या कथा काहीही असो पण आजतरी देवांना फसवणार्या इतकं वाईट कोणीच नाही हे जिल्ह्यातील जनतेला स्पष्टपणे दिसत आहे.