CHAKU-HALLA

जाब विचारणार्‍या बापाचा दारुड्या मुलाने केला खून!

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड शिरूर

बीड दि.24 : वडीलांनी जाब विचारल्याचा राग आल्याने दारुड्या मुलाने बापावरच चाकूने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या पित्याचा औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश बाबासाहेब नागरगोजे (वय 50, रा. लिंबा, ता. शिरूर का.) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. गणेश नागरगोजे यांचा मुलगा स्वामी यास दारूचे व्यसन आहे. मंगळवार (13 जुलै) रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास स्वामी दारू पिऊन घरी आला. त्यामुळे गणेश यांनी त्याला दारू पिऊन घरी का आलास? असा जाब विचारला आणि त्याची कानउघडणी केली. वडिलांनी रागावल्याने संतापलेल्या स्वामीने चाकूने त्यांच्यावर हल्ला चढविला आणि कपाळावर, खांद्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात गणेश गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना मंगळवारी (20 जुलै) दुपारी 1.30 वाजता त्यांचा मृत्यू झाला असे पोलीस हवालदार हरी जाधव यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सदर फिर्यादीवरून स्वामी गणेश जाधव याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

Tagged