खोट्या अ‍ॅट्रॉसिटीविरोधात दलित समाजबांधवच आक्रमक

न्यूज ऑफ द डे बीड माजलगाव

माजलगाव तालुक्यातील आबेगाव येथील घटना; पोलिसांना दिले निवेदन
माजलगाव : तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत आहेत. त्यात काही खोटे गुन्हे देखील नोंद झाले आहेत. कायद्याच्या होत असलेल्या या दुरुपयोगामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. त्यामुळे आता खोट्या अ‍ॅट्रॉसिटीविरोधात दलित समाजबांधवच आक्रमक झाले आहेत. माजलगाव तालुक्यातील आबेगाव येथील एक व्यक्ती गावातील लोकांवर सातत्याने अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप करून असून त्या व्यक्तीविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.23) तक्रार केली आहे. स्वतः दलित बंधावच यासाठी पुढे आल्याने कदाचित राज्यातील ही पहिलीच घटना असावी.

गुलाब महादु शिनगारे असे पोलिसात तक्रार देण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो सातत्याने प्रतिष्ठित नागरिकांवर खोट्या अ‍ॅट्रॉसिटी करत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून खोट्या अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असून याचा दलित समाजाला सुद्धा त्रास होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. दलित समाजबांधवांच्या माहितीनुसार, गुलाब शिनगारे याच्या गैरवर्तनामुळे 15-20 वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी त्याला चोप दिला होता. त्यामुळे तो गाव सोडून गेला होता. त्यानंतर 2-3 वर्षांपासून तो गावात वास्तव्यास आला आहे. तेव्हापासून त्याने गावातील प्रतिष्ठित नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, जिल्हा परिषद सदस्य यांच्यावर जातीचा दबाव दाखवून तीन वेळेस खोटे अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या गुन्ह्यांची चौकशी करुन ते गुन्हे रद्द करण्यात यावेत. तसेच, खोट्या अ‍ॅट्रॉसिटी करणार्‍या गुलाब शिनगारे याच्याविरोधात जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना दिले आहे. यावेळी कैलास शिनगारे, सुरेश कांबळे, पांडुरंग सोनवणे, सुभाष शिनगारे, नारायण शिनगारे, मळीराम भिसे, रंजित शिनगारे, शेख आन्वर शेख रशिद, नारायण शिनगारे, शिवाजी मगर, नवनाथ शिनगारे, सादु जाधव, शिवाजी शिनगारे, मगरदास मंदे आदी दलित समाजबांधवांची उपस्थिती होती.

बैठकीतून समोर आला खोट्या अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा
माजलगाव तालुक्यातील खोट्या अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक राजेंद्र होके पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक पती सचिन डोंगरे, सरपंच भागवत शेजुळ यांनी आबेगाव येथे शुक्रवारी (दि.23) बैठक घेतली. यावेळी दलित समाजबांधवांशी चर्चा केल्यानंतर हा मुद्दा चव्हाट्यावर आला. त्याचवेळी खोटी अ‍ॅट्रॉसिटी करणार्‍या व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी करण्याचा निर्णय घेतला होता. होके पाटील यांनी ज्या-ज्या गावात अशी केस झाली त्या त्या गावात समाज बांधवांची बैठक लावून प्रकरणातील तथ्य समाजासमोर मांडण्याचे अभियान हाती घेतले आहे.

दलित समाजबांधवांवर अन्याय होत असेल तर आम्ही सदैव सोबत आहोत. परंतू, एखाद्या व्यक्तीच्या चुकीच्या वृत्तीमुळे समाजाची नाहक बदनामी होणार असेल, सामाजिक शांततेचा भंग होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. खोट्या अ‍ॅट्रॉसिटीचे कधीच समर्थन होऊ शकत नाही.
-सचिन डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते, माजलगाव

Tagged