बीड जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथील

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; व्यावसायिकांना दिलासा

बीड : चार दिवसापूर्वी राज्य सरकारने ब्रेक द चैन अंतर्गत राज्यातील सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सुधारित आदेश काढले असून रविवार (दि.१५) पासून जिल्ह्यातील सर्व व्यवहार पुर्णवेळ सुरु राहणार असून हॉटेल, उपहारगृह देखील रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत.

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आदेशात म्हटल्याप्रमाणे, सर्व प्रकारची दुकाने रात्री १० वाजेपर्यंत उघडता येणार आहेत. तर उपहारगृह ५० टक्के क्षमतेने पुर्णवेळ सुरु ठेवता येणार आहेत. तसेच, जिल्हा प्रशासनाने सर्व व्यवसाय पुर्णवेळ सुरु ठेवायला परवानगी दिली असली तरी दुकाने, हॉटेल यासाठी तेथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पुर्ण झालेले असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

उपहारगृहे: खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून उपहारगृहे सुरू करण्याची मुभा. उपहारगृहात प्रवेश करताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहिल व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहिल. उपहारगृहामध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचान्यांसह सर्व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचार्‍यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पुर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह वा बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहिल. वातानुकुलित उपहारगृह वा बार असल्यास, वायुवीजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक राहील. प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॉस्ट फॅन असणे आवश्यक. उपहारगृहे वा बार सुरू ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. उपहारगृहात शेवटची ऑर्डर रात्री 9 वाजेपर्यंतच घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरू ठेवता येईल.

दुकाने : सर्व दुकाने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणार्‍या सर्व व्यवस्थापन व कर्मचार्‍यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक. जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा: वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा. एसी असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक.

कार्यालये : खासगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचार्‍यांचे व व्यवस्थापनांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचार्‍यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे. ज्या आस्थापना वरील कर्मचार्‍यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचार्‍यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी. कर्मचार्‍यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे. खासगी कार्यालयाना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सूरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

विवाह सोहळे: खुल्या प्रांगणातील व लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल. या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा. खुल्या प्रांगण वा लॉन मध्ये होणार्‍या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत असेल. बंदिस्त मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादित असेल. मात्र कोणत्याही परिस्थीतीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले जात आहे. याची खातरजमा करण्यासाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यकतेनुसार सक्षम प्राधिकान्याला तपासणीसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक राहिल. या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर तसेच संबंधित हॉटेल वा कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल व मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. सर्व संबंधितांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होऊन दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणे अनिवार्य राहील व त्यानुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक राहील.

सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स : सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स ( स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

धार्मिक स्थळे: सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.

Tagged