high-speed-bullet-train

मराठवाड्यातून बुलेट ट्रेन धावण्याचे रावसाहेब दानवेंकडून संकेत

मराठवाडा महाराष्ट्र राजकारण

औरंगाबाद, दि. 17 : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आज मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पहिल्यांदाच औरंगाबादेत दाखल झाले. यावेळी त्यांनी मराठवाड्यातून बुलेट ट्रेन धावण्याचे संकेत दिले आहेत. या बुलटे टे्रनमुळे औरंगाबाद ते मुंबई हे अंतर अवघ्या दिड तासात पार होऊ शकते तर मुंबई ते नागपूर या अंतरासाठी केवळ तीन तास लागतील अशी माहिती मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

रेल्वे राज्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर रावसाहेब दानवे प्रथमच आपल्या मतदारसंघात जाणार आहेत. तसंच, जन आशीर्वाद यात्राही काढणार आहेत. त्या अनुषंगाने दानवे यांनी आज औरंगाबादेत रेल्वेस्थानकावर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी मुंबई-औरंगाबाद-नागपूर या मार्गावर बुलेट ट्रेन उभारण्याचा विचार बोलून दाखवला.‘खासदार किंवा मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचा मार्ग बदलत नाही. व्यवहार्यता हा महत्त्वाचा मुद्दा असतो. त्यानुसारच मार्ग उभारले जातात. मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनबाबतही मी अभ्यास केला. अधिकार्‍यांची बैठक घेतली. असा काही मार्ग होऊ शकतो का यावर चर्चा केली. तर ते शक्य आहे असं आमच्या निदर्शनास आलं आहे,’ असं दानवे यांनी सांगितलं. ही ट्रेन सुरु झाली तर तर दीड ते पावणे दोन तासांत मुंबईहून संभाजीनगरला (औरंगाबाद) जाता येऊ शकतं. तसंच, तीन ते साडेतीन तासांत आपण मुंबईहून नागपूरला जाऊ शकतो. तसं झाल्यास या भागाचा कायापालट होऊ शकतो. त्यामुळं हा प्रकल्प माझ्या मनात आहे,’ असं दानवे म्हणाले. रेल्वे राज्यमंत्रिपद आल्यामुळं मतदारांच्या व महाराष्ट्राच्या अपेक्षा वाढल्याबद्दल ते म्हणाले, ‘माझं मूल्यमापन जालना, संभाजीनगर, भोकरदन, मराठवाडा किंवा महाराष्ट्रातील कामाच्या आधारे होऊ नये. मी देशाचा मंत्री आहे. मी मंत्री झालो आणि माझ्या गावातच रेल्वे नाही असं म्हणून चालणार नाही. देशात आम्ही नवीन काय करतो आहोत यावर मंत्री म्हणून माझं मूल्यमापन व्हायला हवं,’ असंही ते म्हणाले.