अंबाजोगाई, गेवराई तालुक्यातील घटना
अंबाजोगाई/गेवराई दि.8 : विजेच्या धक्क्याने अंबाजोगाई, गेवराई येथील तीन वेगवेगळ्या घटनात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जवळगावात तुटलेल्या विद्यूत तारेला चिटकून महिलेचा मृत्यू
अंबाजोगाई : तालुक्यातील सुक्षलाबाई विश्वनाथ हारे (वय 58, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. सुक्षलाबाई शुक्रवारी दुपारी शेतातील बांधाच्या कडेने गवत कापत होत्या. जवळच 11 केव्ही विद्यूत लाईनची तार तुटून पडलेली होती. गवत कापण्यात गुंग झालेल्या सुक्षलाबाईंचा स्पर्श या लोंबकळत असलेल्या विद्यूत तारेला झाला आणि विजेच्या जोरदार धक्क्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपानामुळेच सदर महिलेचा बळी गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी बर्दापूर पोलीसात नोंद करण्यात आली आहे.
भोगलगावात विजेच्या धक्क्याने एक ठार, एक जखमी
गेवराई : तालुक्यातील भोगलगाव येथील राणोजी खरात आणि मयत झालेले धोंडीराम रामा कांबळे (वय 65 रा. भोगलगाव ता. गेवराई) हे दोघे गोदावरी नदीच्या पात्रात आंघोळीस जात होते. यावेळी वीज वाहिनीची तार अचानक दोघांच्या अंगावर पडली. यात धोंडीराम कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला तर राणोजी खरात गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत तलवाडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली असल्याची माहीती सपोनि.प्रताप नवघरे यांनी दिली.
तळणेवाडीत युवकाचा मृत्यू
गेवराई : तालुक्यातील तळणेवाडी येथील युवक दिपक भाऊसाहेब गायकवाड (वय 17) हा शेतात विद्यूत मोटार बंद करण्यासाठी गेला होता. त्याला विजेचा जबर धक्का बसला. या अपघातात दीपकचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.