केज तालुक्यातील दुर्देवी घटना
केज दि.8 : तालुक्यातील साळेगाव शिवारातील दस्तगीर माळ भागातील खदाणीत बुडून दोन बालकांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.8) सायंकाळच्या सुमारास निदर्शनास आली. घटनास्थळी केज पोलीसांनी धाव घेतली असून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी केज उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
अनिल बबन शिंदे व प्रकाश बबन शिंदे (रा.चिंचोली माळी) असे बुडून मृत्यू पावलेल्या भावंडांची नावे आहेत. दोघांचे वय दहाच्या जवळ आहे. सदरील बालके नेमके त्या ठिकाणी का गेले होते? घटना नेमकी कशी घडली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, प्रमोद यादव, पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड, अशोक नामदास, धन्यपाल लोखंडे, शिवाजी शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खदाणीतून बालकांचे मृतदेह बाहेर काढून केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.