शिथीलतेचा ‘व्हायरस’ लॉकडाऊन वाढण्याला कारणीभूत

महाराष्ट्र संपादकीय

धी 21 दिवस, नंतर 19 दिवस आणि पुन्हा 14 दिवसांचा कोरोनावास. त्यात पुन्हा मोबाईलवर वाजणारी कॉलरट्यून, आणि केंद्रापासून ते जिल्हाधिकारी पातळीपर्यंत दर अर्ध्या तासाला मिळणार्‍या मार्गदर्शक सुचना, नियमांमुळे लोक पागल व्हायची वेळ आली आहे. एकूण 54 दिवसांचा कोरोनावास आता संपत आला असतानाच पुन्हा बातम्या येत आहेत की अजून एखादा महिनातरी ‘कोरोनावास’ वाढण्याची शक्यता आहे.

केंद्र आणि राज्याने एकदाच काय तो निर्णय घ्यावा. लोक महिनाभर घरात बसायला तयार आहेत. पण हे थोडं उघडा थोडं बंद करा, इतकं का उघडलं? तितकंच का सुरु केलं? दारू सुरु, सलून बंद! दुकानं उघडी, दुचाकी बंद! हे जे सुरुयं ते आगोदर बंद करा. त्याचा परिणाम लोकांच्या मानसिकतेवर होत आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना सोमवारपासून घरी जाऊ देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यांचा हा निर्णय ‘उशीरा सुचलेलं शहाणपण’ असा आहे. पहिला लॉकडाऊन जाहीर झाला त्याचवेळी बस, ट्रेन आणि इतर खासगी वाहतूक किमान 31 मार्चपर्यंत सुरु ठेवायला हवी होती. ज्यामुळे चौथा काय पण तिसराच लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारला घेण्याची गरज पडली नसती. आतापर्यंत जनजीवन सुरळीत झालं असतं. अडकून पडलेली लोक आता गावात परतत आहेत. त्यांच्यामुळे संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने 18 मे ते किमान 5 जूनपर्यंत 100 टक्के लॉकडाऊन करावा. त्यात मेडिकल इमर्जन्सी वगळता कसलीही शिथीलता देऊ नये. सरकार लॉकडाऊनची नियमावली करीत असताना शिथीलतेचा ‘व्हायरस’ सोडत असल्याने कोरोनाचा संसर्ग थांबायचे नाव घेत नाही. लोक आताच ‘करो या मरो’ अशा परिस्थितीत आहेत. अजून काही दिवस लोक ऐकतील पण सारखा-सारखा लॉकडाऊन वाढविल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. देशाची आणि घराघरातील अर्थव्यवस्था सध्या ‘ऑक्सिजन’वर आहे. ती मरून पडू नये.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जनतेला संबोधीत करणार आहेत. ते बोलायला आले की लोक आता मनाची तयारी करून ठेवतात. ते काहीतरी खतरनाकच बोलतात. पण सध्या पोटाची भूक आणि पुढं येणारं अर्थिक संकट हेच कोरोनापेक्षा खतरनाक वाटत आहे. त्यामुळे अजून एखादा लॉकडाऊन जनता सहन करेल त्यासाठी “जे करायचे ते आताच करा, लोक पुन्हा पुन्हा ऐकणार नाहीत” हा ‘भयाण’ आवाज आता कानावर आदळत आहे.

Tagged