mushakraj

‘नाच’ प्रतिष्ठान

न्यूज ऑफ द डे मनोरंजन राजकारण संपादकीय

मुषकराज 2022 भाग 2

(राजुरीच्या भावकीतील वादाचा ट्रेलर पाहिल्यानंतर बाप्पानं दोघांनाही शांत करीत चांगलंच खडसावलं. तसे दोघेही शांत झाले. बाप्पानं उपस्थित असलेल्या एक एकाचे निवेदन घेत कारखानास्थळावरून नगर रोडने बीडकडे मार्गस्थ झाले.)

मुषक : अगं आई ऽऽ आई ऽऽ आईऽऽऽ

बाप्पा  :  आरं… काय झालं?

मुषक  :  काय नाय बाप्पा, तुमी तेव्हढं गच धरून बसा… इकडं पावलागणिक ईकासच ईकास दिस्तोय… काय ती झाडी, काय ते डोंगार, अन् काय ह्यो रस्ता… सगळं नॉट ओक्के बाप्पा…

बाप्पा  : अरे खड्या खुड्ड्यांचा का असेना निदान ह्यो रस्ता तरी ठिवलाय ह्यांनी… नायतर यावर पण कधी प्लाटींग पाडली असती कुणालाच समजलं नसतं. आता बीडात कुठं नदीतरी दिस्तीय का? लहानपणी आलो तवा इथं नदी व्हती. इथं पुन्हा पुन्हा यायला लागलो तर नदीचा वडा झाला अन् आता तर वड्याची नाली झालीय बाबा… या सगळ्यांवर मोठ मोठी घरं झालीत आता काही दिसानं ही नाली साफ करून तिथंच आपली सोय झालेली दिसल बग…
(बर्‍याच वेळेच्या मिरवणुकीनंतर बाप्पा पार थकून गेले होते. रस्त्यावरील खड्ड्यांनी बाप्पाचं अंग जड पडलं होतं. त्यामुळे बाप्पांना आराम करून उद्या लवकर दौर्‍यावर निघायचं असल्याने मुषकानं भक्तांना आपआपल्या घरी जाण्याची विनंती केली. भक्त गेले तसे दोघेही ढाराढूर झाले.)

दिवस दुसरा
(पहाटेचे चार वाजले. पहिला कोंबडा आरवल्याचा आवाज कानी पडला. मुषकानं डोळ्यांची झापडं उघडून आपली शेपटी वर उचलून एकदा जमीनीवर आपटली. तसा शेपटीचा कोन्टा ग्लासला लागून तो खाली पडला. तत्क्षणी बाप्पांची निद्रा भंग पावली. तसा मुषक ताडकन उठून इकडे तिकडे पळू लागला. आता आपलं काही खरं नाही असं म्हणून तो सॉरी सॉरी म्हणू लागला. बाप्पानं त्यांच्याकडे एक तिरपा कटाक्ष टाकत स्मित हास्य केलं. तसा मुषकाचा जीव भांड्यात पडला.)

बाप्पा : चल मला आजचा दौरा दाव

मुषक : आज आपुण साक्षात पिताजींच्या दर्शनाला जाणार हैत… वैद्यनाथ नगरीत… अख्खा जिल्हा एकीकडे अन् तिकडचा उत्सौव एकीकडंय… काल रात्रीच म्या फेसबूकला बघीतलं. काय त्यो डान्सं, काय त्या नर्तिका, काय ते आयोजन… अगं बायऽ अगं बायऽ अगं बायऽऽऽऽऽ जानूविना रंगच नायऽऽऽ

बाप्पा :  एैऽ एैऽऽ एैऽऽऽ काय लावलंस हे सकाळच्या रामप्रहरी… जरा देवा धर्माची गाणे लाव… आरती लाव… जरा माझे गाणे लाव… माझ्या उत्सौवात असं काय बी चालणार न्हाय…

मुषक :  (मनात स्वतःशीच पुटपुटला… तुम्हाला चालत नाय पण तुमच्या नावावर काय काय चालतं हेच यंदा दाखवाय नेयचंय तुमाला) पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा…. (हे गाणे मोठ्या आवाजात म्हणत मुषक आवरा आवरीला लागले.

बाप्पा :  (सकाळच्या सात वाजता दोघेही एका मोटारीत बसून परळीच्या दिशेने रवाना होतात.) अरे अरे सोयाबीन तर पार सुकून गेलंय… कापसाचा फुलं गळून पडलीत… मूग, उडदाचं पण यंदा काही खरं दिसत न्हाय.. थांब इंद्र देवाला फोन लावून पावसाचा खटका टाकायचा सांगतो.

मुषक :  हा करा तेव्हढं… निदान बळीराजाला धीर तरी येईल. न्हायीतरी पीक वायाच गेलंय. जिल्हाधिकार्‍यांना फोन फिरवा अन् तेव्हढा पीकविम्याचा अग्रीम द्या म्हणावं. शेतकरी रडकुंडीला आलाय हिथं. भेगाळलेल्या जमनी बघीतल्याकी दुष्मनाच्या पण काळजाला पीळ पडतोय. आधीच कारखानदारांनी मागच्या वर्साला उसावाल्यांचा पार चोथा करून टाकलाय. एकरी 12 हजारावरून सुरू झालेली तोड शेवटी 25 हजारावर सरकली व्हती. गेवराईच्या एकानं तर भरल्या उसाला काडी लावून झाडाला फाशी घेत स्वतःच्या हातानी सरण पेटविलं. काय र्‍हायलं नाय ओ शेतकर्‍यांपशी… आता आपण जिकडं चाल्लोय तिथं दोन कारखाने… एक तर तुमच्या पिताजीच्या नावानं… पण त्याचा बी पार खुळखुळा करून टाकलाय… दुसरा अंबाबाईच्या नावानं.. त्यानंबी शेतकर्‍यांच्या हाती दोन हजारपण टेकले न्हाईत. आधीच सोयाबीनची गोगालगाईनी कत्तल केली. उरल्या सुरल्या सोयाबीनवर तुमच्या इंद्रदेवाचा कोप… लेकारांची फिस भरायला पैका नाही. घरात ठीवलेलं किडूक मिडूक सुरक्षीत न्हायी.. दावणीला बांधलेली जनावरं चोरी जात्यात… अनेक गावांनी अजून येष्ट्या सुरू न्हाईत… त्यामुळे पोरींची शिक्षणं थांबलीत… काफी शॅपच्या नावानं लॉज अन् मौजमजेच्या नावावर ‘गोल्डन चॉईस’ दाखवलं जातंय. पोरीबाळी सुरक्षीत नैत… नुस्त्या ओरबाडल्या जातायेत. लै दैना अन् लै दुःखय ओ… पण सांगता कुणाला? बाप्पा आता तुम्हीच कायतरी करा…. पण आता आपुन जिकडं चाल्लो तिकडं मातर प्रेम, दया, ‘करूणा’ असलं काय बी दाखवायचं नाय…

बाप्पा :  मला कळतंय रं बळीराजाचं दुख… पण मला कळून काय उपेग. इथल्या लोक प्रतिनिधींना ते वाटलं पाह्यजे ना… (दोघांचा संवाद सुरू असतानाच कुठून तरी आवाज कानी पडला) ‘राह मे खतरे बहुत है, लेकीन ठहरता कौन है? मौत कल आती है, आज आ जाये, डरता कौन है? तेरे लष्कर के मुकाबले मे अकेला हॅूं, मगर फैसला मैदान मे होगा, की मरता कौन है?’ (बाप्पाच्या इशार्‍यानंतर मुषकानं गाडी आवाजाच्या दिशेने घेतली.)

स्पृहाबाई :  इथे आलेल्या साक्षात गणरायांना व्यासपीठाकडे आमंत्रित करते. तसेच ‘भौ’ मला जेव्हा जेव्हा परळीत बोलावतील तेव्हा तेव्हा मी येत जाईन. मीच नाही तर माझ्या सहकारी हेमांगी, तेजा, प्राजक्ता, पूनम, सोनाली यांना देखील पुन्हा पुन्हा इथं यावसं वाटेल असंच इथलं सगळं वातावरण आहे. या सात दिवसात प्राजक्ता, अमृता, ईशा, मानसी, सुप्रीया, कावेरी, श्रेया इत्यादी येत असून सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. भौचं इथलं सगळं तगडं नियोजन पाहून त्या आतापासुनच हरखून गेल्यात. पुढील सात दिवस याच व्यासपीठावर आम्ही शेतकर्‍यांचं दुःख वाटून घेऊ. त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करू… त्याला या सांस्कृतिक(?) कार्यक्रमात चिंब चिंब भिजवू… आता मी इंद्र देवाला साकडं घालण्यासाठी नर्तिकांना आमंत्रित करते…

(प्रचंड टाळ्या, शिट्या, घोषणा… एकच भौऽ धन्नु भौऽऽ अरे जळता काय सामील व्हा… नाद केला पण वाया नाय गेला) (बॅकग्राऊंडला म्युझिक सुरु होते.) (टिप टिप बरसा पाणीऽऽऽ पाणी मेऽ आग लगा लीऽऽऽ कलाकार व्यापीठावर येऊन ठुमके सुरू करतात.)

मुषक :  (बाप्पांच्या कानात) म्या म्हणलं व्हतं ना इथं सगळा आनंदी आनंदय… अख्खा जिल्हा एकीकडे अन् परळीचा उत्सौव एकीकडंय… नादच खुळाय भौचा… कुणी काय पण म्हणो भौ मागच हटत नाय. आता हे नाचगाणं बघून पोरं कापसाला फुलं लागून बोंडं यावी तशी टवटवीत दिसतील… मगा तुमी इंद्र देवाला फोन फिरविल्यावर पावुस पडलाय वाटतुय का तुम्हास्नी… ह्या अंधश्रध्देतून थोंड भ्हाईर या. ह्या बयेनं जे आर्जव केलं ते बघून ‘टिप टिप नव्हे तर बदाबदा बरसा है पावुस…’ इथल्या स्टेजवर फकस्त ‘गब्रुशेठ’ची कमीये… नाय तर चार चाँद नक्की लागले अस्ते.
(बाप्पांचा लालेलाल झालेला चेहरा पाहून ‘गुस्ताखी माफ हो’ म्हणत मुषकानं आता शांत राहणेच पसंत केले. बाप्पाचा राग ओळखून मुषकानं पाठीमागे लावलेलं ‘नाथ’ प्रतिष्ठानचं बॅनर कुरतडून ‘नाच’ प्रतिष्ठान असं केलं.)

– बालाजी मारगुडे, बीड
मो.9404350898
क्रमशः
———-

Tagged