भिकार्‍याचे दोन लाख चोरट्यांनी पळवले, पोलीसांनी तीन तासात शोधून परत केले!

क्राईम न्यूज ऑफ द डे परळी बीड


परळी दि.25 : आयुष्यभर भीक मागून पै-पै जमवलेल्या जवळपास पावणेदोन लाख रुपयांच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला… पैसे चोरी गेल्याने चिंताग्रस्त भिकार्‍याची मदतीसाठी खाकीतला देव उभा राहिला. अन् अवघ्या तीन तासात चोरट्यांना पकडून भिकार्‍याला त्याची रक्कम सही सलामत सुपूर्द केली. याबद्दल पोलीसांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

बाबुराव नाईकवाडे असे त्यांचे नाव आहे. मागील अनेक वर्षांपासून वैद्यनाथ मंदिर परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत. त्यांनी वैद्यनाथ मंदिर परिसरात पै-पै गोळा करुन 1 लाख 72 हजार 290 रक्कम जमा केली होती. मात्र या रक्कमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. आधीच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद असल्यामुळे अनेक भिकार्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. नाईकवाडे यांनाही याचा फटका बसला. त्यातच आयुष्यभराची पुंजी चोरीला गेल्यामुळे नाईकवाडे चिंताग्रस्त झाले होते. बाबुराव नाईकवाडे यांनी हवालदिल होऊन परळी पोलिसांकडे मदत मागितली.

पोलिसांनी तातडीने पावलं उचलत तपास केला. त्यानंतर नाईकवाडे यांची चोरीला गेलेली जवळपास पावणे दोन लाख रुपयांची रक्कम अवघ्या काही तासातच त्यांना मिळवून दिली. त्यामुळे पोलिसांच्या तपास कार्याचं कौतुक होत आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक गोरक्ष पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, गोविंद भताने, तुकाराम मुरकुटे, शंकर बुड्डे, मधुकर निर्मळ यांनी केली.

Tagged