ramesh karad

आ.रमेश कराडांकडून गोपीनाथ गडावर गर्दी; अडचणीत येण्याची शक्यता

परळी बीड राजकारण

परळी : पंकजाताई मुंडे यांचं तिकिट कापून विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्त झालेले आ.रमेश कराड यांनी आज गोपीनाथगडावर दाखल होत मोठी गर्दी केली. पाच किंवा त्यापेक्षा अधिक जणांना एकत्रित जमण्यास मज्जाव असताना, जिल्ह्यातील सगळी प्रार्थनास्थळे बंद असताना त्यांनी गोपीनाथ गडाचे दरवाजे उघडून आत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी घालून दिलेले सगळेच नियम आ.कराड यांनी धाब्यावर बसविल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.
आ.कराड जेव्हा गोपीनाथ गडावर स्व.मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेत होते त्यावेळी त्यांच्या सोबत किमान 50 कार्यकर्ते उभे होते. ढकलाढकली, गर्दीतून वाट काढणे, फोटो घेण्यासाठीची धरपड, तोंडाला मास्क नसले आदी सगळ्याच बाबी कॅमेर्‍यात कैद झाल्या. विशेष म्हणजे हेही आमदार महोदय निवडणूक निमित्ताने मुंबईत होते. मुंबईतून आल्यानंतर त्यांनी खरे तर क्वारंटाईन होणं गरजेचं होतं. पण त्यांनी आज चक्क गोपीनाथगडावर हजेरी लावली. बरे हजेरीह लावली तर लावली पण ना त्यांच्या तोंडाला मास्क होता ना स्वागातासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांच्या. त्यांनी व त्यांच्या स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात काय सुरु आहे, याचं भान राखणं गरजेचं होतं.

जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे लक्ष
आ. रमेश कराड यांनी केलेलं वर्तन कोरोना काळात नक्कीच हरकतीचं असणार आहे. यापुर्वी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी नियमांचा भंग करणार्‍या अनेकांवर गुन्हे नोंद केले आहेत. त्यामुळे कराड यांच्यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

आ.ठाकूर यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता
विधान परिषदेचे सदस्य आ.सुरजितसिंह ठाकूर यांनी पंढरपुरच्या मंदिरात जाऊन कोरोना काळात सपत्नीक पुजा केली होती. त्यामुळे तेथील प्रशासनाच्या आदेशाने त्यांच्यावर पंढरपूर ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तर बीड काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी, यांनीही जिल्हाधिकारी रेखावार यांचे आदेश मोडल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. आ.सुरेश धस यांच्यावर तर तब्बल दोन वेळेस गुन्हा नोंद झालेला आहे.

… तर कुणीही प्रार्थनास्थळ उघडेल
जिल्हाधिकारी यांनी आज कारवाई केली नाही तर उद्यापासून प्रत्येकजण आपआपल्या धर्माची प्रार्थनास्थळे उघडून तिथे नेहमीची पुजा-अर्चा करतील. हा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात 29 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण 
जिल्ह्यात आजच एकदम 13 रुग्ण वाढले त्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या 29 झालेली आहे. असे असताना आ.कराड इतक्या मोठ्या लवाजाम्यासह गोपीनाथगडावर गेलेच कसे? हा प्रश्न निर्माण झाल आहे.

Tagged