अनैतिक संबंधाच्या संशयावरून कोयत्याने चुलत्याचा हात तोडला

न्यूज ऑफ द डे बीड

अंबाजोगाई : नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पुतण्याने वडील आणि दोन भावांच्या मदतीने चुलत्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला चढविला. या हल्ल्यात चुलत्याचा हात मनगटापासून तुटला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील चतुरवाडी येथे रविवारी सायंकाळी घडली.

नागनाथ वैजिनाथ कांबळे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चुलत्याचे नाव आहे. मोलमजुरी करणारा नागनाथ आणि त्याचे भाऊ त्र्यंबक आणि गोपीनाथ हे चतुरवाडीत शेजारी राहतात. नागनाथने दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा पुतण्या अरुण त्र्यंबक कांबळे याला नागनाथचे नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. रविवारी सायंकाळी 5 वाजता नागनाथ गायरानाच्या शेतातून कडबा आणण्यासाठी गेला असता त्यास अरुण आणि त्र्यंबक हे दोघे बापलेक शेतात शेळ्या चारत असल्याचे दिसले. शेतात पेरायचे असल्याने नागनाथने त्यांना शेळ्या चारण्यास मज्जाव केला. त्यामुळे चिडलेल्या बापलेकांनी धावत येऊन हातातील कोयत्यांनी नागनाथवर हल्ला चढविला. यावेळी अरुणने डोक्यात केलेला कोयत्याचा वार अडविताना नागनाथचा हात मनगटापासून तुटला. त्यावेळी नागनाथच्या दुसर्‍या भावाची मुलं नितीन आणि सचिन गोपीनाथ कांबळे हे धावत तिथे आले. या दोघांच्या मदतीने अरुण आणि त्र्यंबकने नागनाथच्या बरगडीवर आणि पायावर आणखी 5 ते 6 वार करून त्याला गंभीर जखमी केले. अरुण कोयत्याने नागनाथच्या मानेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार करणार तेवढ्यात आरडाओरडा ऐकून पळत आलेले दत्ता मोरे, बाबुराव जाधव यांनी त्याला बाजूला काढले. त्यनंतर त्या दोघांनी जखमी नागनाथला तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे प्राथमिक उपचार करून नागनाथला पुढील उपचारासाठी लातूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असा घटनाक्रम फिर्यादीत नमूद आहे. सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर कलम 307, 326, 506, 34 अन्वये अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक केंद्रे करत आहेत.

Tagged