बीड, दि. 21 : शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहाराचे लोण आता माजी आयुक्तांपर्यंत पोहचले असून टीईटीच्या 2018 च्या परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक औरंगाबाद बोर्डाचे विभागीय आयुक्त सुखदेव डेरे यालाही अटक केली आहे. त्याच्याबरोबरच जी. ए. सॉफ्टवेअर तत्कालीन संचालक अश्विनकुमार यालाही पोलिसांनी बंगलुरु येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आल्याची माहिती पुणे सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी दिली.
सुखदेव डेरे हे 2018 मध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण परीक्षा मंडळाचे आयुक्त होते. 2018 च्या टीईटी पेपर फोडण्यामध्ये डेरे याचाही हात असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्याने रात्री त्यांना अटक करण्यात आली आहे. डॉ. प्रीतिष दिलीप देशमुख याच्या अगोदर जी.ए. सॉफ्टवेअरच्या महाराष्ट्राची जबाबदारी अश्विनकुमार याच्यावर होती. त्याच्याशी संगनमत करुन डेरे व तुकाराम सुपे यांनी परीक्षार्थींकडून एजंटांमार्फत पैसे घेऊन त्यांना पास केल्याची माहिती समोर आली आहे. कालच बीड येथील एजंट भाजयुमोचा पदाधिकारी संजय शाहुराव सानप (रा.वडझरी) याला आरोग्य सेवा भरती प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या सायबर विभागाच्या रडारवर आलेल्या जीए टेक्नॉलॉजी कंपनीशी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने 2017 साली परीक्षांसंबंधी करार केला होता, त्यावेळी सुखदेव डेरे हे महाराष्ट्र परीक्षा परिषदेचे आयुक्त होते. 2018 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर ते जीए टेक्नॉलॉजी या खासगी कंपनीच्या सल्लागार समितीत कार्यरत होते हे विशेष. पुणे पोलिसांनी सुखदेव डेरेे यांना संगमनेर येथून केल्यानंतर जीए टेक्नॉलॉजीचे या कंपनीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही बेंगळुरु येथून अटक केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहारप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. 2017 पासून जीए टेक्नॉलॉजीला परीक्षांसंदर्भात करार झाल्यानंतर शिक्षण परिषदेमध्ये गैरव्यवहार सुरु असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे 2017 पासून भरती झालेले सर्वच उमेदवार आता पोलिसांच्या रडारवर आहेत.
परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्या घरातून सुरुवातीला 88 लाख 49 हजारांची रोकड, पाच ग्रॅम सोन्याचे नाणे, पाच तोळे दागिने तसेच पाच लाख 50 हजार रुपयांच्या मुदत ठेवीच्या पावत्या जप्त करण्यात आल्या होत्या. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारात सुपे यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदा संपत्ती जमवल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या कारवाईनंतर सुपे यांना अटकेच्या दिवसापासून निलंबित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
आजी-माजी आयुक्तांचे संगमनेर कनेक्शन..
परीक्षा परिषदेच्या आयुक्तांना अटक झाल्यानंतर आता माजी परीक्षा परिषद आयुक्तही गजाआड गेले आहे. ते संगमनेर तालुक्यातील काकडवाडीचे रहिवासी आहेत. मात्र त्याचवेळी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली असून परीक्षा परिषदेचे विद्यमान आयुक्त व या गैरव्यवहारात आत्तापर्यंत मुख्य सूत्रधार समजले जाणारे तुकाराम सुपे यांचेही संगमनेर कनेक्शन आहे. सन 1993 ते 1996 या कालावधीत सुपे हे संगमनेरच्या अध्यापक महाविद्यालयात (डि.एड्.कॉलेज) प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यामुळे टीईटी परीक्षा घोटाळ्यात अटक झालेले आजी आणि माजी आयुक्तांचे संगमनेर कनेक्शन हा योगायोगच ठरला आहे.