पीडितेची सुटका, एएचटीयू कक्षाची कारवाई
बीड दि.21 : शहरातील सम्राट चौक भागात किरायाने घेतलेल्या घरातून एक दांपत्य कुटणखाना चालवत असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या कुंटणखान्यावर छापा मारत दलालासह आंटीला बेड्या ठोकल्या. यावेळी एका पीडीतेची सुटका करण्यात आली. ही कारवाई सोमवारी (दि.20) दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे केली.
अधिक माहिती अशी कि, सम्राट चौक येथील संतोषकुमार रामेश्वर बंग यांच्या इमारतीत घर किरायाने घेऊन ज्ञानेश्वर निवृत्ती घोलप (रा. रांजणगाव, ता. गंगापूर, जि.औरंगाबाद) आणि सुनिता ज्ञानेश्वर घोलप (रा. बोरगाव, ता.गेवराई) हे दांपत्य महिलांना बोलावून घेत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची गुप्त खबर बीड सोमवारी दुपारी पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे उपनिरिक्षक शिवाजी भारती यांना मिळाली होती. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सतीश वाघ यांनी दुपारी सम्राट चौक परिसरात सापळा रचला. त्यानुसार डमी ग्राहकाने दलाल ज्ञानेश्वर घोलप याच्याशी संपर्क साधला असता त्याने सम्राट चौकातील बंग यांच्या इमारतीत येण्यास सांगितले. तिथे पोचल्यावर डमी ग्राहकाला घोलप दांपत्याने डमी ग्राहकाला एका पिडीतेसोबत खोलीत पाठवले असता त्याने जाता-जाता पोलिसांना इशारा केला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी छापा मारून दलाल ज्ञानेश्वर घोलप आणि आंटी सुनिता घोलप यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून मोबाईल आणि रोख रक्कम असा तीन हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यावेळी वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या एका पिडीतेची पोलिसांनी सुटका करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक सतीश वाघ, पीएसआय भारती, पोलीस कर्मचारी वाळके, बहिरवाळ, महिला पोलीस उगले, खटाने, चालक नेवडे यांनी पार पाडली. घोलप दांपत्याला बेड्या ठोकून फौजदार भारती यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. मंगळवारी न्यायलयात हजर केले असता या दांपत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.